चीन-तैवान संघर्ष पेटण्याची चिन्हे!

10 Jan 2026 09:42:18
तैपेई,
China-Taiwan conflict तैपेईमधून येणाऱ्या घडामोडींमुळे चीन-तैवान संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी चीनला थेट इशारा देत, कोणत्याही परिस्थितीत बीजिंगचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. देशाचे कमांडर-इन-चीफ या नात्याने तैवानच्या सार्वभौमत्वाचे, नागरिकांच्या सुरक्षेचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
 
 

China-Taiwan conflict 
लाई चिंग-ते म्हणाले की चीनकडून सातत्याने दबाव आणि धमक्यांचे राजकारण सुरू असले तरी तैवान झुकणार नाही. चीनचा प्रभाव किंवा दबाव तैवानपर्यंत पोहोचू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सीमापार हस्तक्षेपाच्या प्रयत्नांवरूनच हे स्पष्ट होते की बीजिंगची सत्ता तैवानवर लागू होत नाही आणि तैवान हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग नाही, असेही त्यांनी ठाम शब्दांत सांगितले. फोकस तैवानच्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींनी चीनमध्ये जन्मलेले जपानी खासदार हे सेकी यांच्या तैवान भेटीचा उल्लेख केला. या भेटीनंतर चीनने संबंधित खासदारावर निर्बंध लादून त्यांना देशात प्रवेश करण्यास मनाई केली होती. लाई चिंग-ते यांच्या मते, या घटनेतूनच हे स्पष्ट होते की चीन प्रजासत्ताक अर्थात तैवान आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे दोन स्वतंत्र राजकीय घटक असून एकमेकांच्या अधीन नाहीत.
 
तैवानला लक्ष्य करून चीन जे लष्करी सराव करत आहे, ते कोणत्याही प्रकारे शांततेचा मार्ग नाहीत, असा ठाम इशाराही राष्ट्रपतींनी दिला. चीनच्या घुसखोरी आणि सातत्यपूर्ण दबावामुळे तैवानला आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे स्वप्न कधीही साकार होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून तैवानविरोधात लष्करी हालचाली आणि धमक्या वाढल्या असल्या तरी अलीकडील आंतरराष्ट्रीय अहवाल बीजिंगसाठी गंभीर इशारा मानले जात आहेत.
 
एका अमेरिकन थिंक टँकने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, चीन-तैवान युद्ध झाल्यास चीनला मोठी किंमत मोजावी लागेल, असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, चीनने तैवानवर हल्ला केल्यास सुमारे एक लाख चिनी सैनिक मारले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या सामरिक आणि राजनैतिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर चीनला माघार घ्यावी लागू शकते, मात्र तो तैवानजवळील किनमेन आणि मात्सु ही बेटे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. “जर चीनने तैवानवर हल्ला केला तर” या शीर्षकाखालील हा अभ्यास जर्मन मार्शल फंडने प्रसिद्ध केला असून, त्याला अमेरिकन सरकारकडूनही निधी दिला जातो. या अहवालात मोठ्या युद्धापासून मर्यादित संघर्षापर्यंतच्या विविध शक्यतांमध्ये चीनला होणाऱ्या लष्करी, सामरिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकसानीचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0