वर्धा,
deoli-child-marriage-wardha देवळीचा मुलगा अन् गडचांदूरची अल्पवयीन मुलगी... लग्नाचे वय नसतानाही मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाला. वर मुलगा आणि मुलगी हे नातेसंबंधातीलच... दोघेही वडिलांचे छत्र हरपलेले... त्यामुळे दोघांचीही परिस्थिती जेमतेम होती. चार ते पाच दिवसांपूर्वीच मुलीला गडचांदुरातून देवळीत आणण्यात आले. शुक्रवारी त्यांचा विवाह होणार होता. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याची भनक लागताच चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त झाली. तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून हा बालविवाह उधळून लावला.
deoli-child-marriage-wardha देवळी येथे शुक्रवार ९ रोजी बालविवाह होत असल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या आपत्कालीन फोन सेवेला प्राप्त झाली. माहितीच्या आधारे संरक्षण अधिकारी वैभव राऊतराय, चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, विस्तार अधिकारी संतोष मरसकोल्हे, मुख्य सेविका समृद्धी कदम, समुपदेशक माधुरी शंभरकर, केस वर्कर सूरज वानखेडे आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आउटरीच वर्कर अमर कांबळे, अंगणवाडी सेविका दुर्गा भजभूजे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट दिली. deoli-child-marriage-wardha मुला-मुलीचे पालक व इतर नातेवाईकांमार्फत मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा जबाबानामा लिहून घेत समज देण्यात आली. यासोबतच मुलीचा विवाह १८ वर्षाच्या आत करण्याचा प्रयत्न केल्यास बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
deoli-child-marriage-wardha हा बालविवाह जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या तत्पर आणि समन्वित कारवाईमुळे रोखण्यात आला. सदर कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांच्या मार्गदर्शनात सतर्क नागरिकांच्या माध्यमातून रोखण्यात आला. या कारवाईत स्थानिक पोलिस विभागाने सहकार्य करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार संबंधित पक्षांना समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. deoli-child-marriage-wardha त्यांच्याकडून यापुढे बालविवाहास प्रोत्साहन न देण्याबाबत हमी घेण्यात आली. बालविवाहासारख्या बेकायदेशीर व समाजघातक प्रथांविरुद्ध जागरूक राहावे आणि अशा प्रकारची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तात्काळ चाइल्ड हेल्प लाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी केले आहे.