दुर्दैवी! भीषण अग्निकांड आणि तिघांचा गुदमरून मृत्यू

10 Jan 2026 11:38:19
मुंबई,
Goregaon West fire गाढ झोपेत असलेल्या मुंबईकरांसाठी शनिवारीची पहाट भयावह ठरली. गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग नगर परिसरातील एका इमारतीत पहाटे भीषण आग लागून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

 Goregaon West fire -three-dead-suffocation-mumbai 
महापालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, भगतसिंग नगर येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घरात पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार फ्रिजचा मोठा स्फोट होऊन ही आग लागली असावी. सुरुवातीला आग तळमजल्यावरील विद्युत वायरिंग आणि घरगुती वस्तूंपुरती मर्यादित होती. मात्र काही वेळातच आगीने उग्र रूप धारण करत पहिल्या मजल्यावरील एका खोलीत प्रवेश केला आणि तेथे झोपलेल्या तीन जणांच्या कपड्यांना आग लागली.
आग Goregaon West fire लागली त्यावेळी संपूर्ण इमारतीतील रहिवासी गाढ झोपेत होते. मात्र आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिस्थितीची जाणीव होताच नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी बादल्यांमधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वीजपुरवठा बंद करून अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती पूर्णपणे विझवली.
 
 
या आगीत गंभीर जखमी झालेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, आगीमुळे गुदमरून आणि होरपळून तिघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेत हर्षदा पावसकर (वय १९), कुशल पावसकर (वय १२) आणि संजोग पावसकर (वय ४८) यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.मुंबई अग्निशमन दलाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली असली तरी आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0