नवी दिल्ली,
Maduro-like action against Putin रशिया–युक्रेन युद्ध अद्यापही थांबण्याची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नसताना, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात असतानाच, एका पत्रकाराच्या प्रश्नामुळे व्हाइट हाऊसमध्ये नवी राजकीय खळबळ निर्माण झाली. फॉक्स न्यूजचे वरिष्ठ व्हाइट हाऊस प्रतिनिधी पीटर डूसी यांनी पत्रकार परिषदेत थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विचारले की, जसे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यासाठी कारवाई केली होती, तशीच एखादी मोहीम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात राबवली जाऊ शकते का. हा प्रश्न त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला होता. झेलेन्स्की यांनी सूचक भाषेत म्हटले होते की जर हुकूमशहांवर अशा पद्धतीने कारवाई करता येत असेल, तर पुढील पाऊल काय असावे हे अमेरिकेला ठाऊक आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प यांनी अशा कोणत्याही कारवाईची गरज नसल्याचे स्पष्ट केले. पुतिन आणि माझे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत, असे सांगत त्यांनी या परिस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली. आपण सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मात्र हे काम सोपे नाही, असेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी दावा केला की आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक युद्धे संपवली असून, रशिया–युक्रेन संघर्षालाही अशाच प्रकारे तोडगा निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्याकडे लक्ष वेधत ट्रम्प म्हणाले की, केवळ मागील महिन्यातच सुमारे ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात मोठ्या प्रमाणात रशियन सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय रशियाची अर्थव्यवस्था देखील मोठ्या दबावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या युद्धावर तातडीने तोडगा काढणे अत्यावश्यक असल्याचे ट्रम्प यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव आणखी वाढवणारी एक घटना नुकतीच घडली. एका जुन्या आणि रिकाम्या तेल टँकरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या टँकरच्या संरक्षणासाठी रशियाने आपल्या पाणबुड्या आणि नौदलाची तैनाती केली होती. मात्र बुधवारी अमेरिकेने आइसलँडजवळील अटलांटिक महासागरात संबंधित जहाज ताब्यात घेतले. या कारवाईवर रशियाने तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आणि जहाजावरील क्रू सदस्यांना त्वरित परत करण्याची मागणी केली. रशियाच्या या दबावानंतर अमेरिकेने तत्काळ दोन क्रू सदस्यांना सोडून दिले. या घडामोडींमुळे रशिया–युक्रेन युद्धाबरोबरच अमेरिका–रशिया संबंधांमध्येही नव्या तणावाचे संकेत मिळत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघर्षाचा पुढील टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.