नव्या कंपन्यांना 2032 पर्यंत करावी लागेल प्रतीक्षा

10 Jan 2026 17:36:21
नागपूर,
New airline companies India, केंद्र सरकारने नव्या विमान कंपन्यांना परवानगी दिली, तरी प्रत्यक्षात त्यांचे काम सुरू होण्यासाठी मोठा काळ जाऊ शकतो. कारण, विमानांची उपलब्धता ही सध्या सर्वात मोठी अडचण आहे, असे प्रतिपादन बोईंगचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. दिनेश केसकर यांनी केले.नागपुरातील भारतीय प्रबंध संस्थानमध्ये (आयआयएम) आयोजित संवाद कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते.
 

New airline companies India, 
डॉ. केसकर यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान उत्पादक कंपन्यांकडे 2032 पर्यंतचे ऑर्डर बुक झालेे आहेत. आज बोईंगकडे विमानासाठी ऑर्डर दिली, तरी त्याची डिलिव्हरी साधारण सहा वर्षांनंतरच मिळू शकते. त्यामुळे नव्या विमान कंपन्यांना लगेचच उड्डाणे सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.देशातील विमान वाहतूक क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारतात प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होत असली, तरी देशांतर्गत विमान निर्मिती सध्या शक्य नाही. विमान निर्मितीसाठी सरकार परवानग्या व पायाभूत सुविधा देऊ शकेल. मात्र, कुशल मनुष्यबळाची कमतरता ही मोठी अडचण असल्याचे त्यांनी सांगितले.जमीन, वीज व पाणी मिळू शकते. मात्र, अत्यंत कुशल तंत्रज्ञ व अभियंते सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच बोईंगची विमान निर्मिती केंद्रे जगात केवळ दोनच असून ती अमेरिकेत आहेत, असे ते म्हणाले.
देशातील विमान वाहतूक बाजारात एका कंपनीचे वाढते वर्चस्व हीही चिंतेची बाब असल्याचे डॉ. केसकर यांनी नमूद केले. कोणत्याही क्षेत्रात एकाधिकार निर्माण झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, असे त्यांनी सांगितले. जागतिक व्यापारस्थिती, भविष्यातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रिक विमानांबाबतही डॉ. केसकर यांनी विचार मांडले. अमरावतीतील आपले बालपण, व्हीएनआयटीत शिक्षण घेतल्याचे सांगत विदर्भाशी असलेले आपले नाते व्यक्त केले. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी डॉ. केसकर यांचे स्वागत केले. कार्यकारी शिक्षण विभागाचे अधिष्ठाता प्रा. आलोककुमार सिंह यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0