मर्यादांना हरवून जिद्दीची उंच भरारी

10 Jan 2026 14:44:14
विधी शर्मा
नागपूर, 
vishwajit borade अपंगत्व ही अडचण नसून ती जिद्द आणि मेहनतीपुढे थिटे पडते, याचे जिवंत उदाहरण खामगाव येथील विश्वजीत राजेंद्रसिंग बोराडे या नववीतील विद्यार्थ्याने दिले आहे. श्री अर्जन खिमजी नॅशनल स्कूल, खामगाव येथे शिक्षण घेणाऱ्या विश्वजीतने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय विदर्भ विज्ञान स्पर्धेतील पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या यशामुळे तो आता विदर्भस्तरीय विज्ञान स्पर्धेत सहभागी झाला आहे.
 

boarde  
 
 
तरुण भारतशी विशेष संवाद साधताना वडील राजेंद्रसिंग बोराडे यांनी विश्वजीत जन्मतःच अपंग असल्याचे सांगितले. मात्र या शारीरिक मर्यादांनी तो कधीच खचला नाही. तसेच लहानपणापासून त्याला कुठलेही विशेष वागणूक न देता अगदी सामान्य मुलाप्रमाणे आम्ही त्याचे पालकत्व केले. त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही त्याला नेहमीच प्रोत्साहन देत असतो, असे ते म्हणाले. शेतकरी असलेल्या वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत, शिक्षण आणि जीवनात काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा ध्यास विश्वजीतने यावेळी व्यक्त केला. सामान्य मुलांप्रमाणे तो सायकल चालवतो, बॅडमिंटन व क्रिकेटसारखे खेळ खेळतो आणि आत्मविश्वासाने समाजात वावरतो.
शैक्षणिक क्षेत्रातही विश्वजीतने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत त्याने ‘ए’ ग्रेड मिळवून सातत्यपूर्ण यशाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे तो पायांनी चित्रकला करतो.vishwajit borade याच कौशल्याच्या बळावर त्याने विज्ञान स्पर्धेसाठी तयार केलेले पोस्टर सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले. त्याच्या पोस्टरमधून ‘प्लास्टिकचा वापर टाळा’, ‘पाणी वाचवा’ आणि ‘दुष्काळ टाळा’ असे महत्त्वाचे पर्यावरणपूरक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0