नवी दिल्ली,
Poor cricket board New Zealand जागतिक क्रिकेटच्या चर्चेत श्रीमंत आणि गरीब बोर्डांची तुलना नेहमीच जोर धरते. भारताचा बीसीसीआय, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानचा पीसीबी यांसारखे बोर्ड प्रचंड उत्पन्न कमावतात आणि त्यांच्या खेळाडूंना सुपरस्टार दर्जाची लोकप्रियता मिळते. मात्र, जगातील सर्वात गरीब क्रिकेट बोर्डाची यादीत न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) शेवटच्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे, आणि त्याची एकूण कमाई सुमारे ७५ कोटी रुपये एवढी आहे.
न्यूझीलंडमध्ये क्रिकेटपटूंना सुपरस्टार दर्जा तुलनेने कमी मिळतो, आणि त्यांच्या पगारातही भारतीय खेळाडूंशी मोठा फरक आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टधारक खेळाडूंना त्यांच्या मागील कामगिरी, रँकिंग आणि अनुभवानुसार दरवर्षी १.६५ लाख ते ३.१८ लाख न्यूझीलंड डॉलर (सुमारे १ ते ३ कोटी रुपये) मिळतात. याउलट, भारतात खेळाडूंना ए प्लस, ए, बी, सी अशा चार गटांमध्ये विभागून मानधन दिले जाते. ए प्लस गटातील खेळाडूंना ७ कोटी, ए गटाला ५ कोटी, बी गटाला ३ कोटी आणि सी गटाला १ कोटी रुपये दरवर्षी मिळतात.
न्यूझीलंड क्रिकेटचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मॅच फी देणे. २०२२ पासून लागू झालेल्या करारानुसार कसोटी सामन्यात १०,२५० न्यूझीलंड डॉलर (सुमारे ५.३० लाख रुपये), वनडे सामन्यात ४,००० न्यूझीलंड डॉलर (सुमारे २ लाख रुपये) आणि टी-२० सामन्यात २,५०० न्यूझीलंड डॉलर (सुमारे १.२९ लाख रुपये) दिले जातात. यामुळे आर्थिक मर्यादा असूनही न्यूझीलंड क्रिकेटने समानतेचा आदर्श साकार केला आहे आणि जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.