बांगलादेशच्या राजकारणात मोठा बदल; तारिक रहमान बीएनपीचे नवे अध्यक्ष

10 Jan 2026 09:49:12
ढाका,
Rehman is the new president of BNP ढाका येथे बांगलादेशच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) आपल्या नेतृत्वात औपचारिक बदल केला आहे. माजी पंतप्रधान आणि पक्षाच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या पुत्र तारिक रहमान यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. शुक्रवारी, ९ जानेवारी २०२६ रोजी बीएनपीच्या राष्ट्रीय स्थायी समितीच्या बैठकीत तारिक रहमान यांची पक्षाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळलेल्या खालिदा झिया यांचे ३० डिसेंबर २०२५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व सदस्यांनी तारिक रहमान यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि त्यांना पक्षाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
 
Rehman is the new president of BNP
 
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की पक्षाच्या नियमांनुसार रिक्त पद भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, तारिक रहमान यांची नियुक्ती वैध आणि सर्वसंमतीने करण्यात आली आहे. रहमान हे यापूर्वी बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सुमारे १७ वर्षांच्या स्वयंघोषित निर्वासनानंतर तारिक रहमान अलीकडेच लंडनहून बांगलादेशात परतले होते. आता अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे पक्षाच्या नेतृत्वाची संपूर्ण जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे, अशी माहिती बीएनपीच्या मीडिया सेलने दिली असून, याला बांगलादेश संवाद संघटनेनेही दुजोरा दिला आहे.
 
६० वर्षीय तारिक रहमान हे आगामी निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. यापूर्वी २००२ साली त्यांची बीएनपीच्या वरिष्ठ संयुक्त महासचिवपदी नियुक्ती झाली होती, तर २००९ मध्ये त्यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पक्षात महत्त्वाची भूमिका बजावली होती,  फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आल्याने, बीएनपी सध्या सत्तेच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशा स्थितीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपी कोणती दिशा घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0