मुंबईकरांचे प्रश्न आणि बंगलेकरांचा जश्न

10 Jan 2026 05:30:00
 
 
raj thakarey सध्या मुंबईत छान असं कौटुंबिक वातावरण आहे. कौटुंबिक मेळे होत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन चुलत भाऊ एकत्र आले आहेत. राजकीय मंचावर त्यांचं सबंध कुटुंब दिसत आहे. जणू राजकीय मंच नसून फॅमिली फंक्शन आहे. त्यामुळे सगळाच तसा आनंदी आनंद आहे. 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेबरोबर इतर पालिकांचीही निवडणूक आहे. पण ठाकरे बंधूंनी आपलं सगळं लक्ष मुंबई पालिकेवर केंद्रित केलं आहे. काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुलाखती देत आहेत. त्यातही मुंबई हाच विषय आहे. शक्यतो दुसèया विषयावर ते बोलत नाहीत. आता संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी उद्धव व राज ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यातही केंद्रबिंदू मुंबईच होती. त्याचं कारण मुंबई ही सर्वांत श्रीमंत पालिका असून इथला नगरसेवक आमदाराच्या तोडीचा असतो. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत. ते मुंबईच्या बाहेरचे आहेत.

राज ठाकरे
त्यामुळे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळू शकत नाहीत.’’ आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांनी स्वीडनचं उदाहरण दिलं. ‘‘मी एकदा स्वीडनला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहत होतो. गाड्या फिरतात, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे. सगळे सगळे व्यवस्थित छान. हे सगळे पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन.’’ असं राज ठाकरे म्हणाले. याचा अर्थ असा की बाहेरून आलेल्या माणसाला सगळं छान दिसतं. पण तिथल्या समस्या स्थानिकांनाच माहिती असतात. वरवर पाहता राज ठाकरेंचा मुद्दा योग्य वाटतो. पण याचा सखोल विचार केल्यावर आपल्याला ठाकरेंची वैचारिक व्याप्ती दिसून येते. एका चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना आमदार व्हायचे होते. आमदारकीचा फंड वापरण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पहिलं काम केलं, ते म्हणजे शिवाजी पार्कला विद्युत दिवे बसवून घेतले. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं पहिलं लक्ष गडचिरोलीत राहणाèया आदिवासींकडे जाण्याऐवजी किंवा धारावीतील झोपडपट्टींवासीयांकडे जाण्याऐवजी शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाकडे जातं, तेव्हा त्यांचं वैचारिक अवकाश किती मर्यादित आहे, ते आपल्याला दिसतं.raj thakarey असं मत म्हात्रे यांनी व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की, ‘‘मुंबई-पुणे-नाशिक या गोल्डन ट्रायंगलमध्ये ज्या महापालिका येतात, ज्यांचं अर्थसंकल्प सुमारे 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे, त्या अर्थसंकल्पावर नजर ठेवून ते एकत्र आलेत.’’
म्हात्रे यांनी काय टीका केली, त्याकडे आपण दुर्लक्ष करू. पण उद्धव ठाकरे यांची वैचारिक व्याप्ती ही खूपच कमी आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच कोरोना काळात त्यांनी वर्क फ्रॉम होम केलं. कारण उद्धव ठाकरेंना तसा कामाचा अनुभव नाही. हे त्यांनी स्वतःच मान्य केलंय. मात्र काम शिकण्याची त्यांना कदाचित गरजही वाटत नसावी. आता आपण राज ठाकरे यांच्या विधानाकडे येऊया. राज म्हणाले की, मुंबईतील प्रश्न समजून घ्यायचे असतील तर नेता हा मुंबईकर असायला हवा. हा त्यांचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याबाबत अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईकर असल्याने आणि मुंबईबाहेरच्या समस्या त्यांना माहितीच नसल्याने त्यांनी प्रथम प्राधान्य शिवाजी पार्कला दिलं. पण दुसरी गोष्ट अशी की धारावी सुद्धा मुंबईतच आहे. मग त्यांचं पहिलं लक्ष धारावीकडे का गेलं नाही? म्हणजे राजकारणात प्रदीर्घ काळ घालवल्यानंतरही त्यांना केवळ वांद्रे आणि दादर इथल्या समस्या कळल्यात का? किंवा मातोश्रीच्या आजूबाजूच्या आणि शिवसेना भवनाच्या आसपासच्याच समस्या कळल्यात का? असे काही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडतात. राज ठाकरे यांच्या विधानाला फडणवीसांनी उत्तर दिलंय. पण त्या राजकीय जुगलबंदीत आपण सामान्य माणसाने पडू नये. आपण आपल्या समस्यांना व तर्काला धरून राहूया. राज ठाकरे यांच्या तर्कानुसार प्रत्येक शहराला, प्रत्येक गावाला एक वेगळा मुख्यमंत्री असायला हवा. म्हात्रे यांनी सांगितल्यानुसार जशी उद्धव ठाकरे यांची व्याप्ती आहे, तशी ही राज ठाकरेंची व्याप्ती असावी. पण आज इतके मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले. मग त्यांनी मुख्यमंत्री वा पंतप्रधान होण्यासाठी कुठे जन्म घ्यावा? सयाजीराव गायकवाड यांचा जन्म मालेगावात झाला. पण पुढे ते बरोड्याचे महाराज झाले आणि त्यांनी उत्तम शासन केले. तुम्ही कुठे जन्माला येता हे महत्त्वाचं नसतं तर तुमची वैचारिक व्याप्ती किती आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला लोकांच्या प्रश्नांची किती जाणीव आहे, याचा अधिक महत्त्व आहे. आज राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी माणसांचा मुद्दा उपस्थित करत आहेत, पण त्यांना मराठी माणसाच्या समस्या कळल्या आहेत का? मराठी माणसाच्या हातात दगड देऊन त्याचं भलं होणार आहे का? मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी का कमी झाली? कारण तो पनवेल, नालासोपारा, विरार इथे फेकला गेला. आता तर तो सफाळा, बोईसर, पालघरला चाललाय. कारण मुंबईतील घरे त्याला परवडत नाही. ‘घर’ हा मराठी माणसासाठी कळीचा मुद्दा आहे. मराठी माणसाला आता 10 बाय 10 च्या घरात राहायचं नाही. त्याला थोडं सुटसुटीत राहायचंय आणि मुंबई बिल्डरांच्या घशात गेल्यामुळे त्याला इथे घर घेणं जमत नाही. मुंबई बिल्डरांच्या घशात कशी गेली? याचं उत्तर या नेत्यांनी शोधलं पाहिजे. त्यासाठी ते एक प्रयोग करू शकतात. आरशासमोर उभे राहू शकतात. कदाचित त्यांना उत्तर सापडेल. आज बीएमसीच्या माध्यमातून अनेकांना काँट्रॅक्ट मिळतात. किती मराठी काँट्रॅक्टर आहेत, याची यादी द्यावी. मुंबई मेट्रोमुळे आज मुंबईकर मजेत प्रवास करू शकतोय. 20 रुपयांत तो अशा ठिकाणी पोहोचतो, जिथे पोहचायला त्याला तासभर लागायचा. ही मेट्रो 10 वर्षांपूवी मुंबईत यायला हवी होती. मग का नाही आली? मुंबईतले स्वच्छतागृहे का स्वच्छ नाहीत? मुंबईत पूर्वी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे का उभारली जात नव्हती? पालिका तर त्यांच्याच हातात होती. सांगायचं तात्पर्य असं की राजकीय नेत्यांना आपली वैचारिक व्याप्ती बदलावी लागणार आहे. ती खèया अर्थाने व्यापक करावी लागणार आहे. आपल्या बंगल्याच्या आवारातून शिवाजी पार्कच दिसणार. उर्वरित मुंबई कशी दिसेल? बंगल्याच्या बाहेरही एक मुंबई आहे. त्या मुंबईच्या काही सकारात्मक गोष्टी आहेत, तशा काही समस्याही आहेत. त्या समस्या केवळ मुंबईत जन्मल्याने कळणार नाही. बंगल्यातून बाहेर पडून जनतेत मिसळल्याने कळणार आहेत. बाकी, शिवाजी पार्कच्या आवारात किती अमराठी लोकांनी घरे घेतली आहेत?
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Powered By Sangraha 9.0