शालीमार बागेत महिलेची गोळ्या घालून हत्या

10 Jan 2026 17:01:54
नवी दिल्ली,
Woman murdered in Shalimar Bagh नवी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेत एका महिलेचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. रचना यादव असे मृत महिलेचे नाव असून, ती घराशेजारील परिसरातून परत येत असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्या डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. सकाळी सुमारे अकराच्या सुमारास पीसीआरवर गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
 

shalimar 
दिल्ली पोलिसांचे डीसीपी भीष्म सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा संबंध काही वर्षांपूर्वी झालेल्या रचाच्या पतीच्या खून प्रकरणाशी असण्याची शक्यता आहे. रचना यादव मूळची बलसुआ गावाची रहिवासी असून तिचा पती विजेंद्र यादव यांची २०२२ किंवा २०२३ दरम्यान हत्या झाली होती. त्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून, रचना त्यांना अटक व्हावी आणि न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे प्रकरण जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून किंवा कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रचाच्या पतीच्या हत्येप्रकरणात ज्यांची नावे समोर आली होती, तेच फरार आरोपी या नव्या हत्येमागे असू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक विशेष पथके तयार केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी सुरू आहे. या दुहेरी हत्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0