अमरावती,
borgaon-firing : मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव निस्ताने वाळू घाटावर एका वाळू व्यावसायिकाने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केला. ही घटना शनिवारी उशिरा रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटे गुन्हा दाखल करुन सायंकाळपर्यंत तिन आरोपींना अटक केली होती.

सागर गाढवे (रा. चांदूर रेल्वे) असे अवैध देशी कट्ट्यातून हवेत फायर करणार्याचे नाव आहे. त्याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याचे वाहन वाळू आणण्यासाठी बोरगाव निस्ताने येथे वाळू घाटावर जाते. या घाटाचा काही दिवसांपुर्वीच लिलाव झाला आहे. दरम्यान शनिवारी रात्री सागर गाढवे त्याच्या चारचाकी वाहनाने वाळू घाटावर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत जय ठाकरे, छोटू ऊर्फ रितेश गहूकार व सोनू पठाण हे सुध्दा होते. दरम्यान घाटावर गेल्यानंतर सागरचा घाट व्यवस्थापक हेमंत साठे यांच्यासोबत वाळूवरील रॉयल्टी कमी करण्यावरुन वाद झाला. सागरचे म्हणने होते कि, याच घाटावरुन इतर वाळू व्यावसायिकांकडून कमी रॉयल्टी घेतली जाते व त्याच्याकडून अधिक रक्कम रॉयल्टीपोटी घेतली जाते. यावरुन झालेल्या वादानंतर त्याने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने स्वत:कडे असलेला अवैध देशी कट्टा काढला आणि हवेत फायर केला. घाट व्यवस्थापकाला शिवीगाळसुध्दा केली. या प्रकरणी हेमंत साठेंच्या तक्रारीवरुन मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सागर गाढवे, छोटू गहूकार आणि सोनू पठाण यांना ताब्यात घेतले आहेत.