अमरावती,
young-man-murdered : शहरातील गुन्हेगारीचे वाढते धाडस पुन्हा एकदा उघडकीस आले असून गांधी आश्रम चौक परिसरात भरदिवसा एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाच्या अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही अमरावतीतील पहिलीच हत्या असल्याने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रविवारी दुपारी सुमारे १२.०५ वाजताच्या सुमारास गांधी आश्रम चौक परिसरात ही थरारक घटना घडली. नयन नरेंद्र वायधने (वय १७ वर्ष सहा महिने, रा. हनुमान नगर) असे मृतक युवकाचे नाव आहे. परिसरातच राहणार्या दीपक (वय ३५) व त्याचा सख्खा भाऊ सागर यांनी जुन्या वादातून नयन याच्यावर अचानक चाकूने जीवघेणा हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्याच्यावर ७ ते ८ वार करण्यात आले आहे. हल्ला इतका भीषण होता की नयन घटनास्थळीच कोसळला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
//प्रचार रॅलीदरम्यान घटना
याचवेळी गांधी आश्रम चौकातून प्रचार रॅली जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, क्यूआरटी पथक, डी. बी. स्कॉट आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
//तीन महिला ताब्यात, दोनचा शोध
या प्रकरणात तीन महिलाही घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यावेळी महिलांच्या दोन नातेवाईकांनी नयनवर हा हल्ला केल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही आरोपी फरार आरोपीच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
//प्रेमप्रकरणाची किनार
याप्रकरणी मृतक नयनच्या वडिलांनी खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, नयन हा एका मुलीचा पाठलाग करत होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी त्याला पाहिले. मुलीच्या कुटुंबातील तीन महिलांनी नयनला हटकले. याच दरम्यान, मुलीच्या दोन पुरुष नातेवाईकांनी नयनवर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी नयनवर चाकूने सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच कोसळला.