अमरावती,
bjp-rebels-expelled : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येत आहे. भाजपाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षशिस्त व पक्षविरोधी कारवाई करणार्या १७ जणांचे तब्बल सहा वर्षासाठी निलंबन केले आहे. ही सर्व मंडळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाली होती.

भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने असंतोष निर्माण झाला होता. ज्यांना उमेदवारी मिळण्याची फारच अपेक्षा होती, त्यांचा वेळेवर अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी तातडीने निर्णय घेत दुसर्या पक्षाची उमेदवारी घेतली तर काही अपक्ष मैदानात उतरले. या सर्वांना मागे परत आण्याचे प्रयत्न झाले. हे प्रयत्न फळाला न आल्याने पक्षाने अखेर निलंबनाचा बडगा उगारला आहे. त्यात योगेश वानखडे, विवेक चुटके, धनराज चक्रे, मेघा हिंगासपुरे, सतीश करेसिया, सचिन पाटील, किशोर जाधव, गौरी मेघवाणी, शिल्पा पाचघरे, ज्योती वैद्य, संजय वानरे, संजय कटारिया, दीपक गिरोळकर, रश्मी नावंदर, अनिशा मनीष चौबे, तुषार वानखडे, श्रद्धा गहलोद ठाकूर यांचा समावेश आहे. भाजपा विरोधात यातील काहींनी युवा स्वाभिमान, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या सर्वांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना पाठविण्यात आल्याचे भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी कळविले आहे. केलेल्या या कारवाईचा त्या-त्या प्रभागातील भाजपा उमेदवारांना फायदा होतो का, हे पाहावे लागेल.