४८ दृष्टी बधितांना मिळाली नवी दृष्टी !

11 Jan 2026 20:22:53
गोंदिया, 
gondia-news : नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना चांगल्या सोयी सुविधा पुरविता याव्यात यासाठी पोलिस विभागाच्या वतीने पोलिस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील सशस्त्र दुरक्षेत्रतर्फे निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराचे आयोजन करून परीसरातील ४८ दृष्टीबधितांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टी देण्यात आली.
 
 
 
gond
 
 
गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे दादालोरा पोलिस खिडकी योजनेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोठणगाव येथील दुर्गा चौक येथे १८ डिसेंबर रोजी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये परिसरातील २४० नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. पैकी ५७ रुग्णांना पुढील तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे बोलवण्यात आले होते. यातील ४८ रुग्णांनी सहमती दर्शविल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले होते. दरम्यान, ३ जानेवारी रोजी सर्व रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याने शनिवार १० जानेवारी रोजी सर्वांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले. आदिवासी बहुल व दुर्गम भागात जेथे आरोग्याच्या सुविधा अद्यापही पोहचल्या नाहीत अशा ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने जनजागृती करण्यात येत आहे.
 
 
सर्वांच्या सहकार्यानेच शक्य झाले...
 
 
आरोग्याबाबत अनास्था असलेल्या नागरिकांना जागरूक करुन त्यांची हिरावलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून एओपी गोठणगाव येथील सर्व कर्मचार्‍यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे.
- निलकंठ गिते
पोलिस उपनिरीक्षक तथा प्रभारी अधिकारी,
पोलिस सशस्त्र दुरक्षेत्र, गोठणगाव
Powered By Sangraha 9.0