वर्धा,
Balendu Sharma भारतीय इंटरनेट वापरकर्ते दररोज सरासरी सात तासांपेक्षा अधिक वेळ ऑनलाइन घालवतात. सुमारे ४५ टके लोक नियमितपणे स्मार्टफोन व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतात. तरीही भारतात कंटेंट निर्मितीपेक्षा कंटेंट उपभोग अधिक आहे. एमएस वर्ड, अॅपल यांसारखे प्रमुख प्लॅटफॉर्म भारतीय भाषांना पाठबळ देत आहेत. तसेच २०२२ मध्ये चॅटजीपीटी सुरू झाले, तेव्हा त्यात हिंदी भाषा आधीपासूनच समाविष्ट होती. भविष्यात इंटरनेटवरील सर्वात मोठी भाषा हिंदी असेल, असे मत हिंदी व तांत्रिक तज्ज्ञ प्रा. बालेंदु शर्मा यांनी केले.
उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनऊ आणि हिंदी विश्वविद्यापीठ, वर्धा यांच्या संयुत वतीने आयोजित त्रिदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात ‘२१व्या शतकात तंत्रज्ञानाचा विस्तार आणि हिंदीची उपस्थिती’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कोंकणी लेखक व विद्यापीठाचे निवासी लेखक भूषण भावे होते. सत्रात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रा. पूनम कुमारी, सी-डॅक, पुणेचे संयुक्त संचालक डॉ. सुधीर कुमार मिश्र उपस्थित होते.
यावेळी प्रा. पूनम कुमारी म्हणाल्या, २१व्या शतकातील तांत्रिक विस्ताराने मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम केला आहे. तंत्रज्ञान फत इंग्रजीपुरते मर्यादित आहे ही धारणा चीन, जपान आणि कोरिया यांसारख्या देशांनी मोडून काढली आहे. मातृभाषेत विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची विचारशती वाढते आणि उच्च जीडीपी असलेले देश प्रामुख्याने आपल्या मातृभाषेतूनच कार्य करतात, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. सुधीर कुमार मिश्र यांनी हिंदी भाषा व संगणक क्षेत्रातील सी-डॅकच्या योगदानावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. भूषण भावे यांनी एआय, डिजिटल माध्यमे आणि हिंदी भाषेबाबत समाजात वाढत असलेल्या उदासीनतेशी संबंधित पाच प्रश्न उपस्थित करून श्रोत्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाषा वेगवेगळ्या असू शकतात, मात्र मानवी भावना एकसारख्या असतात, असे ते म्हणाले. संचालन प्रा. डॉ. हर्षलता पेटकर यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. कोमलकुमार परदेशी यांनी मानले.
‘भारतीय साहित्य : अंतर्संबंध आणि वैशिष्ट्य’ या विषयावरील दुसरे सत्र हिंदी व काश्मिरी लेखिका डॉ. क्षमा कौल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून कोलकात्याचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी, जेएनयूचे प्रा. गिरीश नाथ झा, केंद्रीय भारतीय भाषा संस्थान म्हैसूरचे संचालक डॉ. शैलेंद्र मोहन, आसामी लेखक प्रा. किरण हजारिका तसेच हैदराबादचे लेखक प्रा. आर. एस. सर्राजू यांनी आपल्या भाषणांतून भारतीय साहित्यातील अंतर्संबंधांवर विचार मांडले.