लोकशाहीची पेरणी आणि सुगीचा हंगाम!

11 Jan 2026 05:52:55
रोखठोक. . .
 
दिनेश गुणे
democracy भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील सामान्य माणसाला राजकारणापेक्षा शेतीची भाषा लवकर समजते. पण शहरीकरण आणि विकासाच्या गदारोळात शेतीच्या जमिनींवरही विकासाच्या गगनचुंबी खुणा उमटू लागल्यापासून अलिकडे अनेकांना शेतीच्या भाषेचा विसर पडू लागला आहे. त्याऐवजी, राजकारणाची भाषा मात्र सर्वतोमुखी दिसू लागली आहे. गावाकडच्या पारावर, चावडीवर असो किंवा शहरातल्या कट्टा, जॉगर्स पार्कवर असो, सध्या सगळ्यांच्या तोंडी राजकारणाची भाषा ऐकू येते. त्यामुळे, राजकारणाच्या भाषेतून शेतीची भाषा किंवा शेतीच्या भाषेतून राजकारणाची भाषा समजून घेतली, तर शेतीच्या भाषेची जाण तरी शिल्लक राहील. कारण, शेतीची प्रक्रिया आणि लोकशाहीतील निवडणुकीची प्रक्रिया यात कमालीचे साम्य आहे. शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या जमिनीची मशागत करून पीक घेतो, त्याचप्रमाणे जनता निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या भविष्याची मशागत करत असते.
 
 

election  
 
 
शेतीची सुरुवात जमिनीच्या मशागतीपासून होते. नांगरणी, कुळवणी करून जमीन पेरणीयोग्य केली जाते. निवडणुकीतही हीच प्रक्रिया घडते. निवडणुकीपूर्वी होणारी प्रभाग रचना, मतदार नोंदणी आणि राजकीय पक्षांनी बांधलेली मोर्चेबांधणी म्हणजे एक प्रकारची ‘राजकीय मशागतच’ असते. ज्या पक्षाची किंवा उमेदवाराची ही मशागत (जनसंपर्क) उत्तम असते, त्याचे पीक (निकाल) येण्याची शक्यता अधिक असते. मशागतीनंतर, योग्य बियाणांची निवड शेतीचा पुढचा महत्त्वाचा टप्पा असतो. कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यायचे, त्यासाठी कोणते बियाणे निवडायचे, त्याची जातकुळी कोणती असावी, हे जाणून बियाणे निवडणारा शेतकरी हा उत्तम शेतकरी ठरतो आणि त्याची मेहनत वाया जात नाही. त्याने पेरलेल्या बियाणांतून उत्तम पीक निघते आणि त्याला आपल्या स्वप्नातले सुगीचे दिवस पाहता येतात. शेतकरी कितीही कष्टकरी असला, तरी त्याचे बियाणे दोषपूर्ण असेल, तर त्याचे कष्ट वाया जातात. निवडणुकीत ‘उमेदवार’ हा त्या बियाणासारखा असतो. राजकीय पक्ष जेव्हा उमेदवार निवडतात, तेव्हा ते बियाणे ज्या जमिनीत पेरावयाचे आहे त्या जमिनीचा पोत नेमका कसा आहे, तेथे कोणते बियाणे मूळ धरू लागेल आणि योग्य खतपाणी मिळाल्यावर ते फोफावेल याचा नेमका अंदाज जाणकार शेतकèयास असावा लागतो. आपण सकस बियाणे निवडत आहोत की ते केवळ वरून चकचकीत दिसणारे बियाणे आहे, यावर त्या शेतकèयाच्या शेतीचा आणि राजकारण्याच्या मतदारसंघाचा विकास अवलंबून असतो. मतदारांनीही ‘जातीयवाद’ किंवा ‘प्रलोभन’ यांसारख्या कीड लागलेल्या बियाणांऐवजी ‘कर्तृत्व’ आणि ‘इमानदारी’ असलेल्या सकस बियाणाला, म्हणजे उमेदवाराला पसंती देणे आवश्यक असते.
असे योग्य उमेदवाराचे सकस बियाणे रुजू घातले की पुढचा टप्पा, त्याची जोपासना करण्याकरिता, पार पाडावा लागतो. शेतीच्या बाबतीत, बियाणे रुजून फोफावत जावे आणि त्याला चांगले पीक यावे यासाठी योग्य प्रमाणात खत आणि पुरेसे, गरजेएवढे पाणी पाजावे लागते. उमेदवाराच्या रूपाने रुजू घातलेल्या पिकाची मशागत करण्यासाठी त्याला प्रचाराचे खत आणि इतर पोषक द्रव्ये पुरवावी लागतात. शेतकèयाने रुजू घातलेले बियाणे त्या जमिनीच्या ओळखीचे असणे ही शेतीची पहिली गरज असते. म्हणजे, कोणती जमीन कोणत्या बियाणासाठी अनुकूल आहे, त्या बियाणास मुळे धरू देण्याची कोणत्या जमिनीची मानसिकता आहे, हे शेतकèयास नेमके ठावूक असावे लागते. निवडणुकीच्या शेतीत रुजू घातलेल्या उमेदवारांची बियाणेदेखील अशाच हिशेबाने पारखून घ्यावी लागतात. अनेकदा, एखादी शेतजमीन पारंपरिकरीत्या स्थानिक बियाणांचे चांगले पोषण करते, तर उपèया, बाहेरच्या बियाणास थारादेखील देत नाही. अशी बियाणे त्या जमिनीत रुजण्याचा प्रयत्न करतात. क्वचित त्यांना मुळे धरतात, पालवीही फुटते, पण त्यांची वाढ होतच नाही. कितीही खतपाणी घातले तरी ते वाया जातात. कदाचित ती हिरवीगार दिसतात, पण त्यांना मोहोर येत नाही. राजकारणाच्या जमिनीतही स्थानिक बियाणे चांगली रुजतात, जमिनीचा पोतही त्यांना पहिली पसंती देतो आणि परंपरेच्या सवयीमुळे स्थानिक बियाणांची पिकेदेखील चांगली येतात.democracy अलिकडे संकरित बियाणांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही बियाणे कोणत्याही जमिनीत रुजतात. शेतजमिनीने अशा बियाणांचा स्वीकार केला आहे किंवा नाही याचा फारसा विचारही केला जात नाही. अशी, जमिनीच्या मागणीला न जुमानता रुजविलेली पिके कालांतराने अधिक फोफावतात, त्यांचे उत्पन्नदेखील चांगले येते आणि सुरुवातीला नाईलाजाने स्वीकारलेल्या त्या बियाणांना शेतजमीनही निमूटपणे स्वीकारते. पुढे संकरिताचे पेव फुटते आणि त्यांची बाजारपेठ वधारते. आजकाल संकरित बियाणांमुळे शेतकèयाचा सुगीचा हंगाम अधिक चांगला होऊ लागला असून, जमिनीचा पोत बिघडूनही पिके फोफावतात, असेच दिसू लागल्याने शेतीची सारी भिस्त संकरितांच्या पेरणीवरच अवलंबून असलेली दिसते.
अशा जातिवंत, स्थानिक किंवा संकरित बियाणांची मतदारसंघ नावाच्या शेतजमिनीवर पेरणी केल्यानंतर, ज्याप्रमाणे उगवत्या पिकाला खत-पाणी द्यावे लागते, तसाच निवडणुकीत शेतात प्रचाराचा धुरळा उडतो. सभा, रॅली, जाहीरनामे ही मतदारांच्या मनातील विश्वासाला खत-पाणी घालण्याची साधने आहेत. मात्र, जसे अति खतामुळे पीक जळून जाते, तसेच अति-प्रचार आणि खोट्या आश्वासनांच्या भडिमारामुळे कधीकधी मतदार गोंधळून जातो. पिकामध्ये उगवणारे अनावश्यक गवत वेळोवेळी काढून टाकले, म्हणजे जमिनीच्या मशागतीकरिता घातलेले सारे खतपाणी त्या नेमक्या पिकाला मिळते आणि त्याची वाढ जोमाने होते. जमिनीत अनावश्यक गवत असले, तर पिकासाठी घातलेले खतपाणी पिऊन ते तणच फोफावतात आणि मूळ पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे तण काढून टाकण्याचे काम शेतकèयालाच करावे लागते. जमीन मात्र, तटस्थपणे तण किंवा पीक या दोघांनाही आपल्या अंगाखांद्यावर सारख्याच मायेने वाढवत असते. चांगले पीक हवे असेल, तर तण काढून टाकणे ही जशी शेतकèयाची जबाबदारी असते, तशीच जबाबदारी निवडणुकीच्या सुगीच्या हंगामात मतदाराची असते. चांगल्या पिकाच्या निकोप वाढीसाठी अनावश्यक तण काढून टाकण्याचा सुज्ञपणा दाखविणे ही मतदार नावाच्या शेतकèयाची जबाबदारी असते, असे म्हटले जाते. सुगीच्या हंगामात केलेली मशागत ही शेतकèयाच्या पुढच्या हंगामापर्यंतच्या सुखाच्या दिवसांची बेगमी असते. तसेच मतदारांनी तण काढून चांगल्या पिकांना पसंतीचे खतपाणी घातले की त्यांच्या पुढच्या हंगामापर्यंतचा काळ सुखाचा जात असतो. म्हणूनच, सुज्ञ मतदाराने प्रचारातील ‘खोटेपणा’ ओळखून तो बाजूला सारला पाहिजे.
सुगीचा हंगाम आणि कापणी
निवडणुकीचा दिवस म्हणजे शेतकरी आणि मतदारांसाठी सारखाच असतो. शेतीची मशागत, पेरणी, खत-पाणी, राखण, तण काढून टाकणे आणि कापणीनंतर सुगीच्या समाधानात धान्याची कोठारे भरण्याचे जे सुख शेतकèयाच्या पदरात पडते, तो शेतकऱ्याचा खरा सुगीचा हंगाम असतो. निवडणुकीत ज्याच्या पदरात मताचे मोल पडते, तेथे सुगीचा हंगाम सुरू होतो. पण आपल्याकडची बरीचशी शेती निसर्गावरच अवलंबून असते. पाऊसपाणी चांगले झाले, हवामान पोषक असेल, तर पिके चांगली येतात, फळझाडे मोहरतात आणि पिकांचा, फळांचा दर्जाही चांगला राहतो. निसर्गाचा कोप झाला, तर शेतीचा सत्यानाश होतो आणि शेतकऱ्याच्या पदरी पुरती निराशा पडते. अनेकदा निसर्ग हुलकावणी देतो, पाऊस दडी मारून रुसतो, हवामानात अनपेक्षित बदल होतात आणि हातातोंडाशी आलेली पिके हातची गेल्याच्या भावनेने शेतकरी हवालदिल होतो. निवडणुकीच्या हंगामात जनमताचा कौलही असाच, लहरी निसर्गासारखाच असतो. कधीकधी जनमत पसंतीची पावती देते, तर कधीकधी अनपेक्षितपणे हुलकावणीही देते. तीच जमीन आहे, म्हणून शेतकरी त्या जमिनीत वारंवार तीच पिके घेत नाही. आलटून पालटून, प्रत्येक हंगामातील पिकांचा बाज बदलतो. त्यामुळे, जमिनीलाही पिके पारखून घेण्याची सवय लागते आणि कोणते पीक, कोणत्या हंगामात, कोणत्या जमिनीत चांगले फोफावते हे शेतकऱ्यासही समजते. जनमताचा कौलही निसर्गासारखाच लहरी असल्याने, आलटून पालटून पिके घेण्याची शेतकऱ्याची नीती राजकारणात वापरली, तर सुगीचे दिवस समाधानाचे ठरतात. जनमतदेखील पारखता येते. कारण अशा रीतीने केलेली शेती पुढच्या हंगामापर्यंतची बेगमी करून देते. थोडक्यात, शेती आणि निवडणूक या दोन्ही गोष्टी म्हणजे, ‘धैर्याचा, समंजसपणाचा आणि योग्य नियोजनाचा’ खेळ आहे. जर शेतात चांगले पीक आले नाही, तर शेतकरी पुढच्या वर्षी सुधारणा करू शकतो; पण निवडणुकीत जर चुकीचा उमेदवार निवडून दिला, तर मतदाराला पाच वर्षे वाट पाहावी लागते. म्हणूनच, लोकशाहीच्या या शेतीत ‘मतदान’ करताना प्रत्येक नागरिकाने एका जबाबदार शेतकऱ्याप्रमाणे विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण योग्य व्यक्तीची निवड करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासाचे सुगीचे दिवस येतात. निवडणुकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. काहींसाठी हा लोकशाहीचा उत्सव आहे, तर काहींसाठी हा केवळ सत्तेचा खेळ. मात्र, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरांवरील अर्थकारण आणि हालचाली पाहता, ‘निवडणूक म्हणजे सुगीचा हंगाम’ ही संकल्पना वास्तवाच्या खूप जवळ जाणारी वाटते.
सुगीचा हंगाम...
ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर राबतो आणि सुगीच्या हंगामात आपल्या कष्टाचे फळ पदरात पाडून घेतो, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात निवडणुका हा असा काळ असतो जेव्हा अनेक घटकांसाठी संधींची आणि लाभांची ‘पिके’ कापणीला आलेली असतात. हा काळ केवळ उमेदवारांसाठीच नाही, तर सामान्य जनता, व्यापारी आणि कार्यकर्त्यांसाठीही एका अर्थाने सुगीचाच ठरतो.
निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतात. बॅनरबाजी, झेंडे लावणे, रॅलींचे आयोजन करणे आणि घरोघरी जाऊन प्रचार करणे या कामांसाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी लागते. या काळात कार्यकर्त्यांच्या खानपानाची, प्रवासाची आणि अनेकदा रोजंदारीचीही सोय होते. ज्या कार्यकर्त्यांकडे संघटनकौशल्य आहे, त्यांच्यासाठी हा काळ आपली किंमत वाढवण्याचा असतो. निवडणुकीच्या काळात बाजारपेठेत अचानक मोठी उलाढाल सुरू होते. मुद्रण व्यवसाय, जाहिरातींचे फलक, पत्रके, टी-शर्ट आणि टोप्या छापणाऱ्या छपाईखान्यांना चोवीस तास काम मिळते, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. अनेक जण तर, निवडणुकांच्या पुढच्या हंगामापर्यंतची बेगमी एकाच हंगामात करतात. त्यांच्यासाठीचा हा सुगीचा हंगाम तर, लेझीम घेऊन नाचावे एवढा आनंददायक ठरतो. प्रचारासाठी शेकडो गाड्या भाड्याने घेतल्या जातात, ज्यामुळे ट्रॅव्हल एजन्सी आणि वाहनचालकांना मोठा नफा होतो. अलिकडे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची मागणीदेखील निवडणुकांच्या काळात वाढलेली दिसते. मोठ्या सभा, मंडप उभारणी, साऊंड सिस्टिम आणि जेवणावळीच्या कंत्राटांमुळे कॅटरर्स आणि डेकोरेटर्सना सुगीचे दिवस येतात.
दुर्दैवाने, भारतीय राजकारणात निवडणुका आणि पैसा यांचे समीकरण घट्ट झाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दिली जातात. ‘सुगीचा हंगाम’ या अर्थाने पाहिले तर, काही मतदार या काळाकडे आपली प्रलंबित कामे करून घेण्याची किंवा अल्पकालीन आर्थिक लाभ मिळवण्याची संधी म्हणून पाहतात. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा किंवा वैयक्तिक मदतीचा ओघ या काळात वाढतो. केवळ आर्थिकच नाही, तर वैचारिक दृष्टिकोनातूनही हा ‘सुगीचा हंगाम’ असतो. या काळात चर्चांना उधाण येते. चहाच्या टपरीपासून ते सोशल मीडियापर्यंत प्रत्येक ठिकाणी राजकीय विश्लेषणे सादर केली जातात. नवीन नेतृत्व उदयाला येते आणि जुन्या नेतृत्वाच्या कामाचा हिशेब मांडला जातो. लोकशाहीच्या या हंगामात जनमताचे जे पीक येते, त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते.
पण, चांगला शेतकरी उत्तम शेती करताना पुढचाही विचार करत असतो. एक सुगीचा हंगाम संपल्यावर पुढच्या हंगामासाठी शेताची नवी मशागत करावी लागते, हे त्याला माहीत असते. तसेच निवडणुका हा वारंवार येणारा सुगीचा हंगाम असल्याने, पुढच्या हंगामाची तयारीही निवडणुका संपल्यानंतर लगेचच सुरू करावी लागते. निवडणुकीतून पसंतीच्या रूपाने स्वीकारलेले बियाणे दमदार आहे की नाही, याचा अंदाज घेण्यात काही काळ गेला, की तेच पीक पुन्हा घ्यायचे किंवा नाही हे राजकीय पक्ष नावाच्या नावाच्या शेतकèयाने ठरवायचे असते. कारण, अनेकदा, योग्य बियाणे निवडले नाही, तर पिके हातची जातात आणि काही बियाणे जमिनीलाच अमान्य असतात, हे शेतकèयास माहीत असते. हंगाम केवळ ‘घेण्या-देण्यापुरता’ मर्यादित राहिला, तर लोकशाहीचे शेत नापीक होण्याची भीती असते. त्यामुळे या सुगीच्या हंगामात ‘चांगले बी’ पेरले, तरच पुढच्या हंगामापर्यंतचा काळ खèया अर्थाने सुगीचा ठरतो.
मासेमारी जोरात!
पावसाळ्यानंतर, हिवाळ्याच्या हंगामात मासेमारीचाही सुगीचा हंगाम सुरू होत असतो. या काळात मुबलक मासे झुंडीने पाण्यात फिरत असतात. जाणकार मासेमार अशा वेळी गळ टाकून एकेक मासा पकडत नाही. मोठे जाळे फेकून अनेक माशांना एकाच वेळी पकडण्याचे कौशल्य ज्याच्या अंगी असते, तो मासेमार सुगीचे दिवस पाहतो. सध्या मासेमारीचा हा सुगीचा हंगाम राजकारणातही फोफावला आहे. अनेक मोठे मासे कोणाच्या ना कोणाच्या गळाला लागण्यासाठी धडपडत आहेत, तर अनेक मासे झुंडीने कोणत्या ना कोणत्या जाळ्यात अडकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. मासेमाराप्रमाणे माशांनाही सुगीचे दिवस येण्याचा काळ खरोखरीच गमतीदार असतो...
Powered By Sangraha 9.0