युवतीचा निर्वस्त्र व्हिडीओ व्हायरल

11 Jan 2026 21:29:46
अमरावती,
crime-news : ओळखीचा गैरफायदा घेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावून तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार नांदगाव पेठ येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. ओम दीपक शेंदरकर (वय २१, रा. नांदगाव पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
 
 
amyt
 
 
 
पीडिता ही इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असून मागील गणेशोत्सव काळात एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली आणि सोशल मीडियावर चॅटिंग सुरू झाले. दरम्यान, पीडितेचे सोशल मीडिया प्रोफाइल पाहिल्यानंतर आरोपीला तिचे अन्य एका युवकासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती मिळाली. आरोपीने थेट पीडितेला तिचे प्रेमप्रकरण वडिलांना सांगण्याची धमकी दिली.
 
 
या भीतीपोटी आरोपीने पीडितेला मानसिक दबावाखाली ठेवत तिचा निर्वस्त्र व्हिडीओ तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता, तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मोबाईल दुरुस्तीच्या नावाखाली आरोपीने पीडितेकडून एक हजार रुपयांची रक्कम उकळली. त्या पैशांतून मोबाईल दुरुस्त केल्यानंतर आरोपीने पुन्हा अधिक पैशांची मागणी सुरू केली. सततच्या धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून घाबरलेल्या पीडितेने आपले सिमकार्ड फेकून देत नवीन सिमकार्ड घेतले. पीडितेशी संपर्क तुटताच संतप्त झालेल्या आरोपीने तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
 
 
९ जानेवारीच्या रात्री हा व्हायरल व्हिडीओ पीडितेच्या मामांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ९ जानेवारीच्या उशिरा रात्री आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून १० जानेवारी रोजी दुपारी त्याला अटक केली. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, अश्लील व्हिडीओ तयार करणे व तो व्हायरल करणे, धमकी देणे, खंडणी मागणे तसेच पोक्सो अशा गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ओम शेंदरकर याला अटक करण्यात आली आहे.
 
 
अन्य दोन मित्रही रडारवर
 
 
आरोपी ओम शेंदरकर याने संबधीत अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ आपल्या काही मित्रांना देखील शेयर केला होता. यामध्ये आरोपीच्या जवळच्या दोन मित्रांना पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र चौकशीनंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0