चुलीतील ठिणगीने घराला आग, २ लाखांचे नुकसान

11 Jan 2026 20:15:10
पुलगाव, 
house-on-fire : येथील नागपूर फैल भागात एका घराला लागलेल्या भीषण आगीत ८५ वर्षीय वृद्धेचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवार ११ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
 
fire
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर फैल भागातील रहिवासी द्रौपदाबाई सांगोले या दुपारी घरी चुलीवर स्वयंपाक करीत होत्या. स्वयंपाक आटोपल्यानंतर त्यांनी चुलीतील कोळसा पूर्णपणे विझवला नाही. काही वेळाने उर्वरित विस्तवामुळे घराला आग लागली. वार्‍यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घर आगीच्या कचाट्यात सापडले. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी द्रौपदाबाई यांचा मुलगा, सून आणि नातू लग्नानिमित्त नागपूरला गेले होते. घरात केवळ द्रौपदाबाई एकट्याच होत्या. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
 
 
या आगीत घरातील पलंग, लाकडी दरवाजे, गाद्या, वरची छत आणि साठवून ठेवलेले धान्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीची भीषणता एवढी होती की संसारोपयोगी साहित्य असा अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
 
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी तातडीने पुलगाव नगरपरिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपालिकेची अग्निशमन गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी घरावर चढून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे शेजारच्या घरांना होणारा धोका टळला.
 
 
भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे ८५ वर्षीय द्रौपदाबाईंचे मोठे नुकसान झाले असून, पटवारी भरत डेहनकर यांनी पंचनामा केला.
Powered By Sangraha 9.0