टंचाईला ‘ब्रेक’, १३०० टन युरिया पोहोचला कृषी केंद्रांत

11 Jan 2026 20:13:27
खरांगणा (मो.), 
urea-agricultural-center : मध्यंतरी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ऐन रबी हंगामात शेतकर्‍यांची अडचण निर्माण होऊ लागली होती. एक दिवसांपूर्वी जिल्ह्यात सुमारे १३०० टन युरिया उपलब्ध झाला आहे. कृषी केंद्रांमध्ये हा युरिया पोहोचला असून यामुळे युरियाची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
 
 

urea 
 
 
 
सध्या रबी हंगाम सुरू आहे. गहू, चणा आदी पिकांकरिता शेतकर्‍यांना युरियाची गरज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रबी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढलेले आहे. लागवडदेखील वाढलेली आहे. गहू, चणा पिकाच्या अनुषंगाने शेतकर्‍यांना युरियाची गरज निर्माण झालेली आहे. ठराविक वेळेनंतर गहू, चणा पिकाला युरिया देण्यात येतो. सध्या देखील युरियाची गरज आहे. मध्यंतरी आठ ते दहा दिवस जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झालेली होती. युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत होता. युरिया मिळण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागली. वेळेवर युरिया न मिळाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शयता निर्माण झालेली होती. त्यामुळे युरिया कधी उपलब्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आता नुकताच १३०० टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. हा युरिया कृषी केंद्रांपर्यंत पोहोचता करण्यात आल्याची माहिती आहे. युरिया उपलब्ध झाल्यामुळे कृत्रिम टंचाईलादेखील ब्रेक लागलेला आहे.
 
 
युरियाचा पुरेसा साठा : जाधव
 
 
जिल्ह्यात काही दिवसांच्या कालावधीत युरिया उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे काही भागात युरियाची टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. आता युरिया उपलब्ध झाल्यामुळे ही टंचाई दुर होण्यास मदत होणार आहे. युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध झालेला आहे. लवकरच आणखी युरिया उपलब्ध होईल, असे जिपचे कृषी अधिकारी शिवा जाधव यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0