तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
e-challan-fraud-case : तुमच्या वाहनाचे चलान भरा, असा मेसेज किंवा अॅप लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक वाढली आहे. ई-चलानच्या नावाने एपीके फाईल आपोआप इन्स्टॉल होऊन मोबाईल हॅक करते. तसेच बँक खात्यातील रक्कमही साफ होते. जिल्ह्यातून आतापर्यंत 250 तक्रारी वर्षभरात एनसीआरबी पोर्टलवर दाखल झाल्या आहेत.
यातील काही रक्कम सायबर पोलिसांनी फ्रीज करुन ती परत मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. ठगबाजांनी विविध प्रकाराच्या सूचनांचे मेसेज करत त्या माध्यमातून एपीके फाईल्स सेंड केल्या. यामध्ये ई-चलान भरण्यासंदर्भात सर्वाधिक मेसेज आले आहेत. ज्यांनी अनावधानाने या फाइल्स ओपन केल्या त्यांना मोठा फटका बसला आहे. मोबाईलचा संपूर्ण अॅक्सेस ठगबाजाच्या हाती गेल्याने त्यांनी या माध्यामातून ई-व्हॅलेटचा वापर करत बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतली. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. खाते रिकामे झाल्यानंतरच याची माहिती मिळते. अशाच पद्धतीने ठगबाजांनी आपले जाळे अधिक मजबूत केले आहे.
फसवणुकीचा असाही फंडा
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्यानंतर थेट ई-चलान पाठवून दंड ठोठावला जातो. सरकारी चलानप्रमाणे ठगबाजांकडून मेसेज तयार करण्यात येतो. आज प्रत्येकाकडे दुचाकी, चारचाकी वाहन आहे. नियम मोडल्याने चलान असल्याचे समजून मेसेज उघडल्यास त्यातील एपीके फाईलमुळे मोबाईलचा एक्सेस ठगबाजांच्या हातात जातो. याच माध्यमातून बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतात.
तर काय कराल ?
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने एसीआरबी पोर्टलवर तक्रार करावी. यासोबतच 1930 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करुन तत्काळ ठगबाजांची उडवलेली रक्कम होल्ड करता येते. हॅक झालेला फोन बंद करुन त्यातील सीम काढून घ्यावे, संपूर्ण सेटिंग फॉरमॅट करुनच वापर करावा.