वॉशिंग्टन,
Acting President of Venezuela धक्कादायक घडामोड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलिकडेच केलेल्या एका वैयक्तिक सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्वतःला थेट व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्रपती असल्याचा दावा केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वॉशिंग्टनमधून मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाविरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या कठोर कारवाईनंतर ट्रम्प यांची ही पोस्ट समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने मोठी कारवाई करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली होती. मादुरो यांना पत्नी सेलिया फ्लोरेससह न्यूयॉर्कला नेण्यात आले असून, त्यांच्यावर नार्को-दहशतवादाशी संबंधित कट रचल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे. जोपर्यंत व्हेनेझुएलामध्ये सुरक्षित, न्याय्य आणि वाजवी सत्तांतर होत नाही, तोपर्यंत अमेरिका तेथे नियंत्रण ठेवेल, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. व्हेनेझुएलाच्या जनतेच्या हिताचा विचार न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे सत्ता सोपवण्याचा धोका अमेरिका पत्करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, व्हेनेझुएलामध्ये सत्तांतराची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात देशाच्या उपाध्यक्ष आणि तेल मंत्री डेल्सी रॉड्रिग्ज यांनी औपचारिकपणे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा करत सांगितले की व्हेनेझुएलातील अंतरिम प्रशासन अमेरिकेला ३० ते ५० दशलक्ष बॅरल उच्च दर्जाचे आणि प्रमाणित तेल पुरवणार आहे. हे तेल बाजारभावाने विकले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
याआधीच ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलावर दबाव वाढवत चीन, रशिया, इराण आणि क्युबाशी असलेले आर्थिक संबंध तोडण्याची अट घातल्याचे वृत्त समोर आले होते. एबीसी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाची भूमिका अशी आहे की व्हेनेझुएलाने तेल उत्पादनासाठी केवळ अमेरिकेसोबतच भागीदारी करावी आणि कच्चे तेल विक्रीत अमेरिकेला प्राधान्य द्यावे. या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवे वादळ निर्माण झाले असून, जगाचे लक्ष पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडे वेधले गेले आहे.