प्रयोगशील शेतकर्यांच्या कष्टांना व उत्पादन क्षमतेला योग्य सन्मान मिळावा आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या crop competition पीक स्पर्धा योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खरीप व रबी हंगाम २०२५ मध्ये ५५४ शेतकर्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून लवकरच तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रात विविध प्रयोग करून अधिक उत्पादन घेणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही योजना राबविण्यात येते. विजेत्या शेतकर्यांचा गौरव केल्यास इतर शेतकरीही आधुनिक शेती पद्धती स्विकारण्यास प्रवृत्त होतात. यामुळे जिल्हा व राज्याच्या कृषी उत्पादनात वाढ होते, असा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. वंचित व दुर्लक्षित घटकांसह जास्तीत जास्त शेतकरी या crop competition स्पर्धेत सहभागी व्हावेत तसेच महत्त्वाच्या अन्नधान्य व कडधान्य पिकांचे उत्पादन वाढावे, यासाठी या स्पर्धेत खरीप हंगामासाठी सोयाबीन व तूर, तर रबी हंगामासाठी गहू व हरभरा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात २७३ शेतकरी, तर रबी हंगामात २८१ शेतकरी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात आदिवासी व सर्वसाधारण गटातील शेतकर्यांचा समावेश आहे. खरीप हंगामातील निकाल जाहीर न झाल्याने शेतकर्यांना प्रतीक्षा लागली आहे. तर रबी हंगामात शेतकर्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी केली आहे. निकाल जाहीर होताच तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील शेतकर्यांना बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.
crop competition पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये आणि राज्य स्तरावर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये मिळणार आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकर्याला पुढील पाच वर्षे त्या पिकासाठी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, अशी अटही लागू आहे.