गोंदिया,
Gondia ACB news, शासकीय, निमशासकीय कामे करण्यासाठी लाच मागणार्या जिल्ह्यातील 20 शासकीय अधिकारी, कर्मचारी व खाजगी इसम वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या 13 कारवायांत जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत विभागाकडे शहरीभागापेक्षा ग्रामीण भागातून अधिक तक्रारी झाल्याचेही समोर आले आहे. किरकोळ कारणांसाठी लाच मागून सामान्यांना बेजार करणार्या शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.

त्यात सर्वाधिक महसूल Gondia ACB news, खात्याचा समावेश आहे. सन 2025 वर्षांतील सर्वांत जास्त 14 लाचखोर हे लोकसेवक असून त्यांना बेड्या ठोकण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. गत वर्षी पंचायत समितीत झालेल्या दोन कारवायात 3 लोकसेवक, एक खाजगी व्यक्ति, विद्युत विभागातील एका कारवाईत एक लोकसेवक व एक खाजगी इसम, आरटीओ विभागात झालेल्या दोन कारवायात एक लोकसेवक तर 3 खाजगी इसम जाळ्यात अडकले. महसूल विभागाच्या दोन कारवायांत तलाठ्यासह तीन इसमांवर कारवाई झाली. शिक्षण विभागातील कारवाईत लेखाधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका एसीबीच्या जाळ्यात अडकले. आरोग्य विभागाच्या एका कारवाई एक लोकसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका कारवाईत एक लोकसेवक, आदिवासी प्रकल्प विभागाच्या वसतीगृहाचा गृहपालाला रंगेहात लाच घेताना लाच लुचपत प्रबिंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे, असे ब्रीद घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीलच मुलींच्या एका शाळेतील मुख्याध्यापिकेसह शिपायाला लाच घेताना अटक केली. विभागाकडून होत असलेल्या जनजागृतीमुळे आता ग्रामीण भागातूनही नागरिक तक्रारी करताना दिसताहेत. सामान्यांना आवाक्याबाहेर पैसे मागणार्या अधिकारी, कर्मचार्यांविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रारी दाखल होत आहेत. गत वर्षभरात 13 कारवायातून 20 लाचखोरांवर कारवाई करण्यात विभागाला यश आले आहे.
लाच देणे व घेणे गुन्हा आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयात कायदेशीर काम करण्यासाठी किंवा केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अधिकारी, कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच अथवा पारितोषण, बक्षीस मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे संपर्क साधावा, तक्रार करावी.
- उमाकांत उगले
पोलिस निरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया
...