गोंदिया,
Gondia sickle cell campaign गोंदिया जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराला मुळापासून आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी ‘अरुणोदय’ ही विशेष तपासणी मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
सिकलसेल आजार अनुवंशिक रक्तविकार असून तो केवळ रक्त तपासणीद्वारेच ओळखता येतो. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचून तपासणी, निदान व आवश्यक उपचार करण्यावर भर देण्यात येणार आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली. सिकलसेलमध्ये वाहक व रुग्ण असे दोन प्रकार असतात. वारंवार ताप येणे, सांधेदुखी, अशक्तपणा, रक्तक्षय आदी लक्षणे दिसताच नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. सिकलसेल रुग्णांसाठी शासनातर्फे विविध सवलती दिल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजना, एसटी प्रवास सवलत, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेदरम्यान अतिरिक्त वेळ यांसारख्या सुविधांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. सिकलसेलमुक्त गोंदियाच्या दिशेने ‘अरुणोदय’ ही एक निर्णायक पायरी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने रक्ततपासणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनडॉ. जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.
विवाहपूर्व तपासणी करा - डॉ. पुरुषोत्तम पटले
सिकलसेल आजार माता-पित्यांकडून मुलांकडे संक्रमित होतो. त्यामुळे समाजात जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक, पालक व युवकांनी विशेष काळजी घ्यावी, सिकलसेल साखळी तोडण्यासाठी विवाहपूर्व तपासणी करणे अत्यावश्यक आहे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पुरुषोत्तम पटले केले आहे.
हे आरोग्य मंत्र आत्मसात करा
सिकलसेल रुग्णांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा, थंडी-उन्हापासून संरक्षण घ्यावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार घ्यावेत. योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात.