मुंबई,
Mumbai municipal elections महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना मुंबईत जुहू परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय तब्बल १५ ते २० हजार मतदारांनी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील मतदान टक्केवारीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात बहिष्काराचे बॅनर लावण्यात आले आहेत. या परिसरातील सुमारे २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या भागातील निवडणूक वातावरण आता तणावपूर्ण बनलेले आहे.
बहिष्काराचे कारण या Mumbai municipal elections नागरिकांची प्रलंबित विकास समस्या आहे. जुहू परिसरात लष्करी रडारच्या प्रभावामुळे गेल्या ३५ वर्षांपासून सुमारे २०० धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्ट्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे १५ ते २० हजार आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे या नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा केला, परंतु ठोस उपाय मिळालेला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, पण निवडणुका संपल्यानंतर काहीही प्रगती न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.प्रभाग क्रमांक ६८ मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी या नागरिकांची भेट घेतली असून निवडणुकीनंतर नागरिकांची आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. या चर्चेनंतर नागरिक मतदानावरील बहिष्कार मागे घेतात की आपली भूमिका कायम ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की, जर बहिष्कार कायम राहिला तर प्रभागातील मतदान टक्केवारीवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि महापालिकेतील काही महत्वाच्या जागांवर निकाल प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे जुहू परिसरातील नागरिकांच्या या निर्णयावर संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.