सातारा,
satara-army-jawan-last-rites महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रजेवर घरी आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाचा अपघाती मृत्यू झाला आणि ज्या घरात आनंदाचे क्षण साजरे होणार होते, तिथे अचानक शोककळा पसरली.

साताऱ्याच्या दरे गावचे रहिवासी असलेले प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. सिकंदराबाद आणि श्रीनगरसारख्या संवेदनशील भागात त्यांनी देशसेवा बजावली होती. काही दिवसांपूर्वीच ते रजेवर आपल्या गावी आले होते. पत्नी गरोदर असल्याने घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू होती. मात्र नियतीने वेगळाच डाव आखला. प्रमोद जाधव हे दुचाकीवरून वैयक्तिक कामासाठी वाडे फाट्याकडे जात असताना एका भरधाव आयशर टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. satara-army-jawan-last-rites या घटनेने जाधव कुटुंबासह संपूर्ण परिसर सुन्न झाला. या घटनेनंतर घडलेले दृश्य अधिकच हृदयद्रावक ठरले. प्रमोद जाधव यांचे पार्थिव गावात आणले जात असतानाच त्यांच्या पत्नीने एका निरोगी मुलीला जन्म दिला. एकीकडे गावात “प्रमोद जाधव अमर रहे”च्या घोषणा सुरू होत्या, तर दुसरीकडे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण अश्रूंमध्ये विरघळून गेला.

या दुःखाच्या क्षणी सर्वांनाच गहिवरून टाकणारे दृश्य तेव्हा पाहायला मिळाले, जेव्हा प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच पत्नी नवजात बाळाला घेऊन स्मशानभूमीत पोहोचली. अशक्तपणा असूनही पतीला अखेरचा निरोप देण्यासाठी ती आली होती. तिरंग्यात गुंडाळलेल्या जवानाच्या पार्थिवासमोर उभी असलेली आई आणि तिच्या कुशीतले बाळ पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. शहीद जवान प्रमोद जाधव यांच्यावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. satara-army-jawan-last-rites वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, सहकारी आणि हजारो ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. लष्करी तुकडीने हवेत सलामीच्या गोळ्या झाडत आपल्या सहकाऱ्याला अखेरचा सलाम केला. देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या प्रमोद जाधव यांचे अपघाती निधन केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे नुकसान आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेली ही शोकांतिका दीर्घकाळ मन हेलावून टाकणारी ठरणार आहे.