बुलढाणा,
Sindkhed Raja, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा दि. १२ जानेवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दर्शनासाठी सकाळपासून जनसागर लोटला होता. सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी वंशज राजे शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता माँ जिजाऊ यांची महापूजा करुन अभिवादन केले.
यावेळी आ. मनोज कायंदे, माजी मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे, माजी शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सिंदखेडराजा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांना अभिवादन करुन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, आज राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून जिजाऊभक्त, शिवप्रेमी जिजाऊ यांच्या जन्मस्थानी येतात. हे मातृतिर्थ सिंदखेड राजा भूमीचे वैभव आहे. या जन्मोत्सवाचा जनमानसात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या दर्शनाने अनेकांना नवी प्रेरणा मिळते. राज्य शासनाने सिंदखेड राजा विकास आराखडा जाहीर केला आहे.