देवळी,
pankaj-chore : स्थानिक सृजन कॉन्व्हेंट व ज्यू. कॉलेज येथे १० रोजी पब्लिक व्हॅल्यू कल्चरल अॅण्ड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. पंकज चोरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला आमदार राजेश बकाणे, माजी खासदार रामदास तडस, देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे, समाजसेवक मोहन अग्रवाल, नगरसेवक राहुल चोपडा, डॉ श्रद्धा चोरे, डॉ. प्रशांत चव्हाण, नीरज चोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, देवळीसारख्या ग्रामीण भागात १५-२० वर्षांपूर्वी एखादा शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात उतरवतो, त्यातून सृजन कॉन्व्हेंटसारखा वटवृक्ष उभा राहतो, ही बाब गौरवास्पद आहे. राजकीय लोकांचे पुतळे होतात परंतु एका सर्वसामान्य शिक्षकाचा इतका सुंदर पूर्णाकृती पुतळा स्व. चोरे यांच्या सुंदर व्यतिमत्त्व ओळखून पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून उतरविण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक स्व. प्रा. पंकज चोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. श्रद्धा चोरे व संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत चव्हाण यांनी सहकार्यांच्या मदतीने सृजन शाळेचा वारसा समर्थपणे पुढे नेला. आज सृजन कॉन्व्हेंट ही परिसरातील एक नामांकित व सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख निर्माण करत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यत केली. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या अध्यक्ष डॉ. श्रद्धा चोरे व सचिव डॉ. प्रशांत चव्हाण यांनी केली. संचालन मयूर तेलरांधे यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता वाडेकर यांनी केले. सोहळ्याला स्व. पंकज चोरे यांचे माजी विद्यार्थी, शिक्षक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.