इराणमध्ये हिंसाचाराचा १७ वा दिवस: ६४६ मृत्यू, हजारो अटकेत

13 Jan 2026 15:09:43
तेहरान,
646 deaths in violence in Iran इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा आज १७ वा दिवस आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ६४६ जणांचा मृत्यू झाला असून हजारो जणांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका मीडिया एजन्सीने या मृतांचा आकडा जाहीर केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात अचूक मानला जातो. तथापि, इराण सरकारने मृत आणि जखमींच्या संख्येची अधिकृत पुष्टी केलेली नाही. इराणमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने इंटरनेट आणि फोन कॉलवर बंदी घातली आहे. त्यामुळे देशातील वास्तविक परिस्थितीचे अचूक आकडे मिळवणे कठीण झाले आहे. अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्था या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. इराण ह्युमन राइट्स नॉर्वेच्या मते, आतापर्यंत निदर्शनांमध्ये ६४८ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी नऊ अल्पवयीन आहेत.
 
 
646 deaths in violence in Iran
 
 
हजारो लोक जखमी झाले आहेत आणि मृतांचा आकडा अधिक वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी चिंता व्यक्त करत इराण ह्युमन राइट्सने आंदोलकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आंतरराष्ट्रीय समुदायाचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. महागाईच्या विरोधात सुरू झालेले निदर्शन पहिले तेहरानमध्ये सुरू झाले आणि नंतर देशभर पसरले आहेत. गुरुवारी, एका शवगृहाबाहेर डझनभर मृतदेह पडलेले दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. आतापर्यंत १,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारामुळे इराणमध्ये सामाजिक अस्थिरता आणि दहशत निर्माण झाली असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0