टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; एलिसा हिलीची निवृत्ती जाहीर

13 Jan 2026 09:16:33
सिडनी,
Alyssa Healy announces retirement टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का बसला असून, दिग्गज महिला क्रिकेटपटू एलिसा हिलीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावर्षी होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघरचनेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. ३५ वर्षीय हिलीने मार्च २०२६ नंतर निवृत्त होणार असल्याचे स्पष्ट केले असून, भारताविरुद्धची आगामी मालिका तिची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे. १२ जानेवारी रोजी ‘विलो टॉक’ पॉडकास्टवर बोलताना हिलीने आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. भारताविरुद्धची मालिका ऑस्ट्रेलियासाठी तिची शेवटची असेल, असे सांगत तिने मनातील भावना व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियासाठी खेळण्याची आवड आजही कायम असली तरी, क्रिकेट खेळायला प्रवृत्त करणारी स्पर्धात्मक ऊर्जा हळूहळू कमी होत असल्याची जाणीव झाल्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
 
Alyssa Healy retirement
 
२०२३ मध्ये मेग लॅनिंगनंतर एलिसा हिलीची ऑस्ट्रेलियाच्या पूर्णवेळ कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ती भारत दौऱ्यातील टी-२० सामन्यांमध्ये खेळणार नाही. ती केवळ एकदिवसीय मालिकेत सहभागी होईल. त्यानंतर ६ ते ९ मार्चदरम्यान पर्थ येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याद्वारे ती आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. हा तिच्या कारकिर्दीतील ११ वा आणि अखेरचा कसोटी सामना असेल. हिलीच्या निवृत्तीनंतर आगामी महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
 
 
फेब्रुवारी २०१० मध्ये अवघ्या १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलेल्या एलिसा हिलीने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले. तिने १२३ एकदिवसीय सामन्यांत ३५६३ पेक्षा अधिक धावा केल्या, तर १६२ टी-२० सामन्यांत २५.४५ च्या सरासरीने ३०५४ धावा झळकावल्या. नाबाद १४८ धावांची तिची सर्वोत्तम खेळी ही महिला टी-२० क्रिकेटमधील पूर्ण सदस्य देशाच्या खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. ती ऑस्ट्रेलियाच्या महिला टी-२० संघातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळीही मानली जाते. एलिसा हिली ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णकाळाची साक्षीदार ठरली आहे. तिने २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ या वर्षांत महिला टी-२० विश्वचषक जिंकला, तर २०१३ आणि २०२२ मध्ये एकदिवसीय विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाचा झेंडा फडकावण्यात मोलाचा वाटा उचलला. तिच्या कामगिरीची दखल घेत २०१८ आणि २०१९ मध्ये तिला आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर हा मानही मिळाला. एलिसा हिलीच्या निवृत्तीने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमधील एक यशस्वी पर्व संपुष्टात येत आहे.
Powered By Sangraha 9.0