चांदूर रेल्वे नगरपरिषदेत भाजपाचा उपाध्यक्ष

13 Jan 2026 21:44:40
चांदूर रेल्वे, 
chandur-railway-municipal-council : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत राजकीय चुरस शिगेला पोहोचली होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार बच्चू वानरे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत उपाध्यक्षपदावर आपले नाव कोरले.
 
 

AMT 
 
 
 
मंगळवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांनी पिठासीन अधिकारी म्हणून बैठकीचे कामकाज पाहिले, तर मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ‘आपलं चांदूर पॅनल’कडून अरिहंत गेडाम यांनी जोरदार लढत दिली, मात्र अखेरच्या क्षणी एका मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मतदानादरम्यान सभागृहात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला होता. दरम्यान, याच बैठकीत स्वीकृत सदस्यपदासाठीही निवड करण्यात आली. भाजपकडून डॉ. सुभाष पनपालिया, तर ‘आपलं चांदूर पॅनल’कडून डॉ. निलेश विश्वकर्मा यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली.
 
 
निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांनी समन्वयाने काम करण्याचे संकेत विजयी उमेदवारांकडून देण्यात आले. दुसरीकडे, ‘आपलं चांदूर पॅनल’नेही लोकहिताच्या मुद्दांवर रचनात्मक आणि सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे.
 
 
//वाढवली राजकीय उत्सुकता
 
 
नगरपरिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ‘आपलं चांदूर पॅनल’ आणि काँग्रेस हे दोन राजकीय घटक एकत्र आले असून, काँग्रेसच्या चार नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाने ‘आपलं चांदूर पॅनल’ला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे ‘आपलं चांदूर पॅनल’कडे आता एकूण १० नगरसेवकांचे संख्याबळ झाले असून, आगामी सभापती निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेत निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे येत्या काळात शहराच्या विकासकामांवर या नेतृत्वाचा निर्णायक प्रभाव दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0