ऐतिहासिक स्थळांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

13 Jan 2026 06:30:00
 
वेध. . .
 
नितीन शिरसाट
 
archaeological departments छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे झाला. 12 जानेवारी रोजी 428 वा माँ जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी हजारो शिवप्रेमी, जिजाऊभक्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दाखल झाले आहेत. मातृतीर्थ हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून सुद्धा जगभर प्रसिद्ध झाले आहे. येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला राजवाडा, रंगमहाल, काळाकोट, लखुजीराजे समाधी, मोती तलाव, चांदणी तलाव, पुतळा बाख, सजना बारव, बाळसमुद्र, रामेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, सावकार वाडा यासह अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या ऐतिहासिक वास्तू व गडकिल्ल्यांचे तसेच पुरातत्त्व वास्तू, हेमाडपंथी मंदिरांचे जतन, सवंर्धन करण्याची केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी आहे. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने शासनामार्फत विकास कामांचा निधी मंजूर होतो. मात्र प्रत्यक्षात दुर्दैवाने कुठलीच सोयी सुविधा या पर्यटन व गडकिल्यांच्या स्थळी प्रत्यक्षात दिसत नाही फार मोठी खंत आहे. राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त आणि पर्यटक सिंदखेड राजा येथे येतात. मात्र, त्यांच्या वाहनांसाठी शहरात सुसज्ज पार्किंग व्यवस्था नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच, दूरवरून येणाऱ्या भक्तांना थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी पुरेसे भक्त निवास किंवा निवारा शेड उपलब्ध नाहीत. आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय न झाल्याने अनेकदा त्यांना त्रास सहन करावा लागतो.
 

archalogist  
 
तीर्थक्षेत्राला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी अनेक वर्षापासून धूळ खात पडली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखवता या भूमीचा सन्मान करावा आणि या ऐतिहासिक वारशाला राष्ट्रीय दर्जा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाने आता तरी कागदी घोडे नाचवणे थांबवून 411 कोटींचा निधी प्रत्यक्षात सिंदखेड राजाच्या मातीत मुरवावा अन्यथा शिवप्रेमींचा असंतोष उफाळून येईल असे चित्र निर्माण झाले आहे. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करताल त्याच धर्तीवर 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सिंदखेड राजा येथे येऊन जिजाऊंची शासकीय महापूजा करावी अशी मागणी होत आहे. तसेच रायगडाच्या पायथ्याशी असलेले पाचाडमध्ये स्वराज्याची जननी माता जिजाऊंची समाधी आहे. मात्र आज दुर्दैवाने ही ऐतिहासिक आणि भावनिक वारसा स्थळे अविकसित अवस्थेत आहेत. स्वराज्याची प्रेरणास्थाने असतानाही येथे मूलभूत सुविधा अभाव प्रकर्षाने जाणवतो.राज्यातील अनेक गड-किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्याची जबाबदारी असलेल्या पुरातत्त्व विभागाने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक पुरातन ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यासाठी परातत्व विभागाने नियुक्त केलेले कर्मचारी इतर राज्यातील असल्याने त्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांची पुरेशी माहिती नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने हाती घेतलेले आंदोलन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आत्मसन्मानाचे आंदोलन आहे. जिजाऊ राजवाड्यात असलेली भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात यावी ही मागणी रास्त आणि न्याय्य आहे. या मूर्तीला केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक महत्त्व आहे. राज्य सरकार, पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभाग यांनी याबाबत तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पालकमंत्र्यांनी एकही आढावा बैठक घेतलेली नाही, कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, यावरून शासनाची उदासीनता स्पष्ट होते, असा आरोप राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले आहे. जिजाऊंच्या जन्मोत्सवाला दरवर्षी लाखो जिजाऊ भक्त दर्शनासाठी येतात मात्र त्यांच्या सोयीसुविधांसाठी कोणतेही ठोस नियोजन केले जात नाही. पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, पार्किंग, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण अभाव आहे. राजवाड्यात नगरपालिकेमार्फत पर्यटकांकडून तिकीट वसुली सुरू असताना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने तिकीट वसुली तात्काळ बंद करण्यात यावी तसेच मातृतीर्थच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये मंजूर होऊनही प्रत्यक्ष विकास का दिसत नाही, याबाबत शासनाने तात्काळ श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी मराठा मोर्चाने लावून धरली.
मो. 9881717828
Powered By Sangraha 9.0