देवळी नगरपरिषदेत भाजपची सरशी

13 Jan 2026 20:40:54
देवळी, 
deoli-municipal-council : देवळी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत भाजपाचे राहुल चोपडा यांची उपाध्यक्षपदी, तर स्वीकृत सदस्यपदी रवींद्र कारोटकर व प्रकाश चांभारे यांची निवड करण्यात आली.
 
 

JH 
 
 
 
ही विशेष सभा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी सभेचे प्रशासकीय कामकाज पाहिले. २० सदस्यसंख्या असलेल्या नगरपरिषदेत भाजपचे १६ नगरसेवक, काँग्रेसचे ४ नगरसेवक व नगराध्यक्ष अपक्ष असल्याने उपाध्यक्ष व दोन्ही स्वीकृत सदस्य पदे भाजपकडे जाणे निश्चित होते.
 
 
भाजपतर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या कडून एक व आमदार राजेश बकाने यांच्या उपाध्यक्ष व एक स्वीकृत सदस्य देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खासदार गटाकडून रवींद्र कारोटकर व डॉ. श्रावण साखरकर, तर आमदार गटाकडून दिनेश क्षीरसागर व प्रकाश चांभारे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र ऐनवेळी भाजप गटनेते उमेश कामडी यांनी रवींद्र कारोटकर व प्रकाश चांभारे यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांच्या नावांवर अंतिम शिकामोर्तब झाले.
 
 
दरम्यान, आमदार बकाने यांच्याकडून आधी चर्चेत असलेले दिनेश क्षीरसागर यांचे नाव वगळण्यात आल्याने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व संत खटेश्वर महाराज मंदिर समितीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. या संघटनांनी मुख्याधिकारी यांना प्रकाश चांभारे यांच्या विरोधात लेखी आक्षेप सादर करून सदस्यत्वाची चौकशी करून रद्द करण्याची मागणी केली आहे.
 
 
नवनिर्वाचित उपाध्यक्ष राहुल चोपडा हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते असून भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत आनंद साजरा केला.
Powered By Sangraha 9.0