कुरखेडा,
ashok-uike : खरीप हंगामात धान्याची विक्री करून एक महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकर्यांना विकलेल्या धान्याचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने कुरखेडा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. धान्य चुकारे मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी वर्ग आस लावून बसला असून त्यांचे चुकारे देण्यासंदर्भातील येणार्या अडचणी दूर कराव्या व त्वरित चुकारे देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी आदिवासी विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून आधारभूत धान्य खरेदीचे केंद्र सुरू झाले आहे. काही खरेदी केंद्रावर 2 ते 3 हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. सरासरी प्रत्येक खरेदी केंद्रावर 100 ते 200 शेतकर्यांनी धान विक्री केली आहे. खरेदी करण्यात आलेल्या तारखेपासून एक महिन्याच्या कालावधी होऊनही एकाही शेतकर्याला धान्य विक्रीचे पैसे मिळाले नाही.
आधीच संकटात असलेल्या शेतकर्यांना पुढील रब्बी हंगाम कसा करायचा, या समस्येमध्ये शेतकरीवर्ग सापडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी ही बाब आदिवासी विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांच्या निदर्शनास आणून देत त्यांना शेतकर्यांचे प्रलंबित धान्य चुकारे शेतकर्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.