गोंदिया,
menopause-clinic : महिलांच्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात उद्भवणार्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळीच, शास्त्रीय व संवेदनशील उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. हे क्लिनिक १४ जानेवारीपासून कार्यान्वित होणार असून, दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) स्वरूपात सेवा दिली जाणार आहे.

रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांमध्ये गरम झटके, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, अस्थिसुषिरता (ऑस्टिओपोरोसिस), वजनवाढ तसेच हृदयविकाराचा धोका वाढणे अशा विविध समस्या दिसून येतात. मात्र अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. हे टाळण्यासाठी महिलांना सुलभ, समर्पित व सल्लामसलतयुक्त आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘मेनोपॉज क्लिनिक’ची संकल्पना राबवण्यात येत आहे. या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी, आवश्यक उपचार, मानसिक आरोग्य समुपदेशन तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी उपचार, आवश्यक तपासण्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहितीही येथे देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. दर बुधवारी होणार्या या विशेष ओपीडीचा महिलांनी लाभ घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून पुढील आयुष्य अधिक निरोगी व सुरक्षित बनवावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यातील सर्वच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांसह काही निवडक ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा देण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातही गोंदिया जिल्हा रुग्णालयासह तिरोडा उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर ग्रामीण रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ पुरुषोत्तम पटले
जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया