मेटामध्ये मोठी टाळेबंदी; १,५०० कर्मचाऱ्यांवर गंडांतर

13 Jan 2026 15:31:12
वॉशिंग्टन,
Major lockdown in Meta जगातील आघाडीची टेक कंपनी मेटा (फेसबुकची मूळ कंपनी) मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. २०२६ मध्येही आयटी आणि टेक क्षेत्रातील टाळेबंदीचा ट्रेंड कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्ट, टीसीएससह अनेक जागतिक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कपात केली होती आणि आता मेटाही त्याच मार्गावर जात असल्याचे चित्र आहे.
 
 
Major lockdown in Meta
 
मिळालेल्या माहितीनुसार, मेटा यावर्षी सुमारे १,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. ही कपात प्रामुख्याने कंपनीच्या ‘रिअ‍ॅलिटी लॅब्स’ विभागात केली जाणार असून, या विभागात सध्या अंदाजे १५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. एका वृत्तानुसार, या टाळेबंदीची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मेटाचा हा निर्णय कंपनीतील धोरणात्मक बदलांचे स्पष्ट संकेत देतो. कंपनी आता ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीपेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटर्ससारख्या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यावर भर देत आहे. त्यामुळे इतर विभागांतील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला जात असून, त्याचाच भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली जात आहे.
 
रिअ‍ॅलिटी लॅब्स हा मेटासाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो. या विभागातून एआर आणि व्हीआरशी संबंधित हार्डवेअर व सॉफ्टवेअर उत्पादने विकसित केली जातात. याची सुरुवात ‘ओक्युलस’ या व्हीआर हेडसेट बनवणाऱ्या स्टार्टअपपासून झाली होती. पामर लस्की यांनी स्थापन केलेल्या या स्टार्टअपला किकस्टार्टरवरून मोठा पाठिंबा मिळाला होता. २०१४ मध्ये फेसबुकने ओक्युलसचे अधिग्रहण केल्यानंतर, तो मेटाच्या व्हीआर आणि एआर तंत्रज्ञानाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.
 
दरम्यान, टाळेबंदीची अधिकृत घोषणा होण्याआधीच कंपनीतील अस्वस्थता वाढली आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मेटाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अँड्र्यू बॉसवर्थ यांनी बुधवारी रिअ‍ॅलिटी लॅब्समधील सर्व कर्मचाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक वर्षातील सर्वात निर्णायक बैठक मानली जात असून, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संभाव्य टाळेबंदीच्या घोषणेच्या अवघ्या एक दिवस आधी ही बैठक आयोजित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती, चिंता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0