सासरच्या दबावामुळे विवाहितेची आत्महत्या

13 Jan 2026 11:42:38
बीड,
married woman committed suicide बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात एका २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृतकाचे नाव अरुणा ठोंबरे असून, ती तीन मुलींची आई होती. आत्महत्येचे कारण घरगुती छळ आणि मानसिक त्रास असल्याचे सांगितले जात आहे. अरुणा ठोंबरेच्या पती उद्धव ठोंबरेने दारू पिऊन मारहाण केली, तर सासू-सासरकडून देखील सतत छळ होत असल्याचे आरोप आहेत. या त्रासाला कंटाळून १० जानेवारी रोजी दुपारी तिने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
 
 

married woman suicide 
अरुणा ठोंबरेच्या तीन मुली उघड्यावर आल्या आहेत. मोठी मुलगी राजनंदिनी पाच वर्षांची असून, चार वर्षांच्या आर्या आणि अपूर्वा या जुळ्या मुली आहेत. सासरच्या लोकांनी 'तुला सलग तीन मुलीच झाल्या आहेत, आमच्या वंशाला दिवा पाहिजे' असे म्हणत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, ज्यामुळे ती अखेर या टोकाच्या निर्णयाकडे वळली.
 
अरुणाचा विवाह लातूर जिल्ह्यातील आजरखेडा येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी म्हणून १६ ऑगस्ट २०१९ रोजी केज तालुक्यातील उद्धव ठोंबरे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर तीन मुली झाल्या; मात्र सासरच्या मंडळींना मुलगा हवा असल्याने सतत त्रास सुरू झाला. शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व लोक कामावर असताना अरुणाने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मयत अरुणाचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांनी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती उद्धव ठोंबरे, सासू इंदूबाई ठोंबरे आणि सासरे उत्तम ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0