आले किती, गेले किती...

13 Jan 2026 05:00:00
 
अग्रलेख 
 
mumbai marathi आपल्या कर्तबगारीच्या रेषेची लांबी अधिक राखण्यासाठी इतरांच्या कर्तबगारीची रेघ पुसायची नसते, तर आपल्या रेषेची लांबी पुसली जाणार नाही याची काळजी घेत तिची लांबी अधिक वाढवायची असते, असा सल्ला देणारी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पण मराठी माणसाच्या मानसिकतेची जी काही मोजकी वैशिष्ट्ये सांगितली जातात, त्यासोबत ही म्हण काहीशी विसंगतदेखील असल्याचे मानले जाते. आज जग जवळ येत आहे, देशोदेशीच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन माणसामाणसांतील जवळीक वाढत आहे, माणसांतील सहकार्याची भावना वाढीस लागून एकमेकांस साहाय्य करून अवघ्यांची प्रगती साधावी हा विचार स्वीकारला जात आहे. एका बाजूला, वसुधैव कुटुम्बकम या भारतीय संस्कृतीचा प्रसार जगभर सुरू आहे, तो विचार स्वीकारला जात असून, ज्यांच्याकडे देण्यासारखे भरपूर काही आहे ते त्यांनी अभावग्रस्तांस द्यावे आणि आपल्या प्रगतीसोबत त्यांच्याही प्रगतीस हातभार लावावा अशी भावना बळावत आहे, तर दुसरीकडे माणसामाणसांतील भेदभावही वाढत असून वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक अंतरही दुणावत चालले आहे.
 
 
 

मराठी माणूस  
 
 
 
अनेक कारणांमुळे सामाजिक जवळीक पुसली जात आहे आणि कुटुंबव्यवस्थेची अवस्थाही चिंताजनक होत चालली आहे. अशा परिस्थितीत, आपल्या रेघेची लांबी मोठी राहावी यासाठी फारसे प्रयत्न करण्याऐवजी इतरांच्या रेषा पुसणेच सोपे असल्याचे ओळखून तसे प्रयत्नही होताना दिसत आहेत. मराठी माणसांच्या मानसिकतेबाबत तर तसेच बोलले जात असल्याने, त्या मानसिकतेसाठी ही म्हण अतिशय चपखल असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे, तर असे करणे हीच मराठी मानसिकता, असा कुचेष्टेचा सूरही याबाबत लावला जातो. आपली प्रगती होत नसेल तर दुसऱ्याचे पाय खेचावेत आणि त्याच्या प्रगतीचा मार्ग रोखावा ही मराठी मनाची बुरसट मानसिकता असल्याच्या टीकेची टोचणी मराठी संस्कृतीस केव्हापासून लागून राहिलेली असल्याने, बदलत्या जगात आणि वैश्विक मानसिकतेच्या कक्षा विशाल होत असताना अशी संकुचित मानसिकता पुसली पाहिजे या जाणिवा रुजविण्याची आता खरी गरज आहे. मराठी माणसाची प्रवृत्ती खेकड्यासारखी असते, अशा कुत्सित उपमादेखील कधी कोणाकडून दिल्या जातात, तेव्हा मराठीपणाच्या वास्तवाकडे तटस्थतेने पाहून भल्याबुऱ्याचा हिशेब मांडण्याचा व गरजेनुसार बदल अथवा दुरुस्त करण्याचा शहाणपणा अंगी आला पाहिजे असा सध्याचा काळ आहे. मराठी मानसिकतेस संकुचितपणाचे लेबल चिकटविले जात असेल, त्या मानसिकतेस खेकड्याच्या स्वभावाची उपमा दिली जात असेल किंवा इतरांच्या कर्तृत्वाच्या रेषा पुसून आपल्या रेषेची लांबी वाढविण्याचा त्याचा स्वभाव असल्याचे सांगितले जात असेल, तर ते बदलणे आणि प्रगतीच्या व उत्कर्षाच्या वाटेवर चालताना इतरांचे बोट धरण्याची गरज मराठी मानसिकतेने ओळखली पाहिजे. कारण, बदलत्या जगाची ती गरज आहे आणि त्यासोबत चालण्यातच खरे हित आहे. हा बदल स्वीकारणे आणि अंगीकारणे सोपे नाही, कारण, या मानसिकतेचा पगडा जुनाच असल्याने एकदम तो काढून फेकून देणे काहीसे अवघडही होऊ शकते. त्यामुळेच, त्यासाठी प्रखर निर्धार हवा आणि त्या मानसिकतेच्या खाणाखुणादेखील जवळपास फिरकणार नाहीत याची जाणीवपूर्वक काळजीदेखील घ्यावयास हवी. पण त्या जाणिवा जोपासण्याऐवजी, इतरांच्या रेषा पुसण्यातच गर्क राहिले, तर कर्तृत्वाची उंची आणि लांबी खुंटलेलीच राहील यात शंका नाही. अस्तित्व किंवा कर्तृत्व हे आपल्या क्षमतेवरच अवलंबून असते आणि कोणीही आपल्या कर्तृत्वाच्या रेषा पुसण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तसे करणे कोणासही शक्य होणार नाही, एवढी आपल्या कर्तृत्वाची उंची निर्माण करण्यातच खरे यश असते, हे ओळखून आपल्या कर्तृत्वाच्या रेषांची लांबी अधिकाधिक वाढविण्याऐवजी, आपल्या रेषा पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचे रडगाणे गात राहिले, तर आपल्या आसपासच्या रेषांची लांबी कधी मोठी झाली हे कळणारही नाही. कारण, आपल्या कर्तृत्वाच्या रेषांची लांबी वाढविण्याच्याच स्पर्धेचे युग सध्या सुरू आहे. याचे भान ठेवले, तर ही मानसिकता पुसून जगाच्या बरोबरीने चालणे सोपे होणार आहे.
 
मुळात, संकुचित मानसिकता निर्माण होण्याची कारणे शोधताना, मराठी माणसाच्या स्वाभाविक वाटचालीचा मागोवा घेणे योग्य ठरेल. मराठी माणूस मुळात कर्तबगार आहे, पराक्रमी आहे आणि मराठीपणाच्या कर्तबगारीने इतिहासाची असंख्य पाने सोनेरी होऊन सजलेली आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या कर्तबगारीच्या रेषा अगोदरच एवढ्या लांब आहेत, की ती लांबी गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्तबगारीच्या असंख्य पायऱ्या पार करतानाही एखाद्याची दमछाक होऊ शकते. असे असतानाही, आपल्या कर्तबगारीवर विश्वास ठेवण्याऐवजी किंवा कर्तबगारीच्या इतिहासात भर घालण्याऐवजी आपल्या कर्तबगारीच्या रेषा पुसण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या अवास्तव भयाखाली सतत वावरत राहणे हेच गैर असतानाही, आसपास सातत्याने याच भीतीच्या घंटा बडविल्या जात असून, आपल्या अस्तित्वावर संकट असल्याचे भय दाखवून त्याचे काही लाभ उपटण्याची कारस्थाने हेच या भीतीचे कारण ठरणार असे दिसू लागले आहे. अशी भीती दाखविण्याची जी काही कारणे आहेत, त्यामध्ये राजकारण हे महत्त्वाचे कारण आहे, हे आता लपून राहिलेले नाही. अस्तित्व पुसण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा बागुलबुवा माणसासमोर उभा केला की त्या भयाच्या सावटाखाली असुरक्षितपणाची भावना बळावते, ते वास्तव आहे किंवा नाही याची खात्री करण्याच्याही फंदात फारसे कोणी पडत नाही आणि भयग्रस्तांच्या कंपूत सहभागी होऊन मुळातच नसलेल्या भीतीपासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता धडपड सुरू होते. अलिकडच्या काहींच्या संकुचित राजकारणाने नेमके हेच ओळखले असून अस्तित्व पुसण्याच्या कटाचा बागुलबुवा दाखवून मराठी मनावर कब्जा मिळविण्याचे नेमके हत्यार त्या हातात आले आहे.mumbai marathi मुंबईवरील मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा कांगावा करून अगोदरच अस्तित्वाच्या भयखुणा उमटलेल्या मनामनात आणखी असुरक्षितता पेरण्याचा हा प्रयत्न दीर्घकालानंतर मराठी मने कमकुवत करून सोडणारा आणि हतबलतेच्या भावनांना खतपाणी घालणारा ठरू शकतो, याची पर्वादेखील अशा राजकारणात केली जात नसेल, तर मराठी मानसिकतेच्या पराक्रमी इतिहासाची परंपरा पुढे चालविण्याची उमेदही संपून जाण्याची भीती अधिक आहे.
मुंबईतील मराठी माणूस हद्दपार करण्याचा, मुंबईचे मराठीपण पुसण्याचा आणि मुंबईतील मराठी माणसाचा हक्क हिरावून घेण्याचा कट सुरू असल्याचा कांगावा करून राजकारण करण्याचा हा प्रयत्न म्हणजे, हतबलतेच्या भावना रुजविण्याचा व त्याचे तात्कालिक लाभ उठविण्याचा एक प्रयत्न ठरू शकतो. ते टाळण्याची गरज असताना उलट आता त्यापुढचे पाऊल टाकले जात असल्याचे दिसू लागले असून केवळ भावनिक राजकारण करून मराठी मने कमकुवत करण्याचा व त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची शंका यावी असा खेळ सुरू झाला आहे. मराठीपण पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा कांगावा करून भय पेरण्याच्या राजकारणाचा प्रभाव पुरेसा ठरत नसल्याची जाणीव कदाचित या कांगाव्याच्या लाभार्थींना आता झाली असावी. त्यामुळेच त्यापुढे जाऊन आता नावे पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा कांगावा सुरू झाला आहे. मुळात, वर्तमानावर उमटलेल्या नावामागेही इतिहासाचीच पुण्याई आहे हे न ओळखता किंवा आजच्या काळावर आपली नावे उमटली यामध्ये आपले कर्तृत्व नेमके काय याचा विचारही न करता हा नवा कांगावा सुरू करणे म्हणजे नावामागे असलेल्या कर्तबगारीच्या रेषेची लांबी वाढविण्यात येणाèया अपयशाची कबुली ठरते. इतिहासावर आपली नावे उमटविणाèयांच्या पुण्याईवरच आपल्या कर्तृत्वाच्या रेषांची लांबी वाढली आहे याची जाणीवही न ठेवता, नावे पुसण्याच्या भयाचा बागुलबुवा उभा करून भावनिक भयाचे नवे हत्यार आता उपसले जाऊ लागले आहे. आपल्या नावापुढे जन्मदात्याचे नाव नसते, तर आपण शून्य आहोत याची जाणीव बोलून दाखविणाèयांना अगोदरच आपल्या कर्तृत्वाच्या रेषेची लांबी नेमकी किती आहे हे माहीत आहे. ती लांबी वाढविण्यासाठी आपण कोणते कर्तृत्व दाखविले, याचा हिशेबदेखील मांडता येत नसेल, तर अगोदरच्या पिढ्यांच्या कर्तृत्वाची रेषा जपण्याची तरी उमेद जिवंत ठेवावयास हवी. केवळ इतिहासाची जपणूक केली नाही म्हणून भूतकाळातील अनेक कर्तबगार नावेदेखील इतिहासातून पुसली गेली, हादेखील एक इतिहासच आहे. एखाद्या नावाची प्रतिष्ठा वाढविण्याएवढी कर्तबगारी दाखवून इतिहासताने लिहिलेल्या नावावर सोनेरी मुलामा चढविण्याची कर्तबगारी गाजवायची, की नावे पुसली जाणार या भीतीचा बागुलबुवा समोर उभा राहिल्याचे भासवत हातपाय गाळून इतरांकडे आधाराची अपेक्षा करायची, हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. अन्यथा, कोणत्याही मानसिकतेला लागलेल्या गैरसमजाची कीड पुसणे अवघडच होत जाईल.
Powered By Sangraha 9.0