महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला

13 Jan 2026 21:38:17
अमरावती, 
municipal-election : महापालिकेच्या २२ प्रभागातील ८७ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीचा जाहीर प्रचार मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजता थांबला. तत्पूर्वी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने भाजपा उमेदवारासाठी भव्य प्रचार रॅली काढली होती. उमेदवारांनी आता गाठीभेटींवर जोर देणे सुरू केले आहे. गुरूवारी मतदान तर शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.
 
 
AMT
 
मनपा निवडणुकीसाठी ३ जानेवारीपासून जाहीर प्रचार सुरू झाला. या काळात अनेक ठिकाणी सभा झाल्या. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो तर उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या समावेश आहे. या शिवाय अन्य नेत्यांच्याही सभा झाल्या. वातावरण चांगलेच ढवळून निघाले. २२ प्रभागामध्ये दररोज सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध उमेदवारांचा प्रचार सुरू होता. भोंगे व स्पिकरच्या माध्यमातून उमेदवरांचा होणार्‍या प्रचाराने शहरातली प्रत्येक गल्ली आणि चौक दणाणून गेला होता. जाहीर प्रचाराच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी जवळपास सर्व प्रभागातल्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी भव्य प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, बसपा, वंचित बहुजन आघाडी, युवा स्वाभिमान या पक्षाचा प्रामुख्याने समावेश होता. मतदारांनी या रॅलींचे बारकाईने निरीक्षण केले.
 
 
भाजयुमोच्यावतीने नेहरू मैदान येथून भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढली. या रॅलीत खा. अनिल बोंडे, भाजयुमोचे अध्यक्ष विक्की शर्मा व अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध प्रभात निघालेल्या भाजपाच्या प्रचार रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी खा. नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, निवडणूक प्रमुख जयंत डोहनकर, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, किरणताई महल्ले, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर यांच्यासह अन्य नेत्यांनी सहभाग घेतला होता. काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील देशमुख, यशोमती ठाकूर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. रवि राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार केला. आता जनता कोणाला कौल देते हे पाहावे लागेल.
Powered By Sangraha 9.0