'नागपूरच्या विकासाची पहिली फिल्म हिट, दुसरी लवकरच' - नितीन गडकरी

13 Jan 2026 19:32:34
नागपूर,
Nitin Gadkari : सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कल्याण हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून नागपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकीय भावनेतून कोणतीही कामे न करता, तसेच कुठलाही भेदभाव न ठेवता जात आणि धर्म यांचा विचार न करता केवळ विकासालाच प्राधान्य देण्यात आले. याच धोरणात्मक आणि सर्वसमावेशक विकासामुळे आज नागपूरचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदललेला दिसून येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नागपूरच्या बांगलादेश भागातील नाईक तलाव परिसरात आयोजित प्रचार रॅलीत ते बोलत होते.
 
 
 
GADKARI
 
 
भाजपाच्या प्रभाग क्रमांक २०, २२ आणि ८ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली. यावेळी आमदार प्रविण दटके, माजी आमदार गिरीश व्यास आणि माजी आमदार विकास कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर शहराच्या विकासकामांची पहिली ‘फिल्म’ यशस्वी ठरली असून आता दुसरी ‘फिल्म’ लवकरच पाहायला मिळणार आहे. आगामी काळात नागपूरमध्ये अनेक नवे प्रकल्प सुरू होणार असून विकासाचा वेग अधिक वाढेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
 
 
शहरातील स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला. नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन झाले असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला रेल्वे फाटकाचा प्रश्न सुटला आहे. अंतर्गत रस्त्यांची व्यवस्था झाल्यानंतर मुंबई-कोलकाता रेल्वेलाईनवर अंडरपासची नितांत गरज होती, तीही आता पूर्ण झाली आहे. हलबा समाजासह विविध घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
कमाल चौकातून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन ३० मार्चपूर्वी करण्यात येणार असून या पुलामुळे अवघ्या बारा मिनिटांत ताजबागच्या पलीकडे पोहोचता येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची गंभीर समस्या सुटणार आहे. नागपूर शहरातील वर्धा रोड, कामठी रोड आणि पारडी येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांनी विश्वविक्रम नोंदवले असून सर्वात खालचा रस्ता, त्यावर रेल्वे मार्ग, वाहनांसाठी पूल आणि त्यावर मेट्रो मार्ग अशी अत्याधुनिक रचना साकारण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
 
गोरगरीब नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचा आनंद मिळावा, यासाठी बांगलादेश वस्तीतील गरीब कुटुंबांना सरकारच्या वतीने स्वतःच्या मालकीची घरे देण्यात आली आहेत. घरांच्या किंमती वाढल्या असतानाही गोरगरीब जनतेला घराचा अधिकार मिळाला असून आतापर्यंत ७०० घरांच्या नोंदण्या पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
नागपूर जिल्ह्यातील हातमाग उद्योगाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी धापेवाडा येथे हातमाग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच दहा हजार चौरस फुट क्षेत्रफळावर भव्य इमारत उभारण्यात येणार असून त्यानंतर हातमागावरील साड्या विणण्याचे काम सुरू होईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
Powered By Sangraha 9.0