फडणवीसांशी कोणतेही मतभेद नाही!

13 Jan 2026 10:27:53
मुंबई,
no disagreements with Fadnavis महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींच्या दरम्यान अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील राजकीय समीकरणांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत “नाही, कोणताही परिणाम होणार नाही. माझ्या आणि मुख्यमंत्र्यांमध्ये १०० टक्के कोणतेही मतभेद राहणार नाहीत,” असे सांगितले.
 
 
 
ajit and fadnavis
 
 
बीएमसी निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार यांनी शिवसेना-भाजप आणि ठाकरे बंधूंवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुणी मराठीचा मुद्दा पुढे करत आहे, तर कुणी जातीचा मुद्दा उपस्थित करत आहे. हे सर्व मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरले जात असले तरी मुंबईतील जनता प्रगल्भ आहे आणि ती स्वतः योग्य निर्णय घेईल. १६ जानेवारी रोजी निकाल समोर येतील आणि चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, १९९९ पासून ते राजकारणात आहेत आणि आजवर बहुतांश निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेससोबत युती करूनच निवडणुका लढवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा आणि संसदेत दोन्ही पक्षांनी एकत्र काम केले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अनेकदा मित्र पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवतात. भाजप आणि शिवसेनेतही पूर्वी असेच झाले आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडींमध्ये काही वेगळे किंवा असामान्य आहे, असे समजण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
याचवेळी अजित पवार यांनी आपल्या विचारसरणीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, आपली विचारधारा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. भारत हा विशाल देश आहे आणि येथे राहणारे सर्वजण भारतीय आहेत. मात्र, कोणी देशाविरोधात कारवाया करत असेल, देशद्रोह करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा गुन्ह्यांसाठी कठोर कायदा करून मृत्युदंडाची तरतूद असावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
Powered By Sangraha 9.0