गोंदिया,
nylon-kite-string-seized : शहरातील मूर्री परिसरामध्ये एक इसम प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या आधारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने मंगळवार १३ जानेवारी रोजी छापामार कारवाई केली असता एका विधीसंघर्ष बालकाकडे ९ हजार रुपये किमतीच्या नायलॉन मांजाच्या ९ चक्री आढळून आल्या. पोलिसांनी सदर मांजा जप्त केला असून याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह अनेक नागरिक अपघात ग्रस्त होतात. काही घटनांमध्ये जीवितहानी देखील झालेली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा वापरणार्या तसेच विक्री करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे बजावले आहे. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मरघाट रोड वरील संत श्री आसारामजी गुरुकुल समोर एक इसम प्रतिबंधीत नायलॉन मांजा बाळगुण विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. याआधारे पोलिस पथकाने छापामार कारवाई केली असता १६ वर्षीय विधिसंघर्ष बालकाजवळ बॅग मध्ये प्रतिबंधीत मनाई केलेले ९ नग नॉयलॉन मांजा चक्री किमत ९ हजार रुपये व एक बॅग असा ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सदर विधिसंघर्ष बालक (वय १६) रा. मुर्री/गोंदिया याच्या विरोधात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.