रील्सच्या तालावर ‌‘जेन झी‌’ ला वाहतूक शिस्त

13 Jan 2026 21:47:00
विधी शर्मा
नागपूर, 
nagpur-traffic-police : शहरातील वाहतूक शिस्त बळकट करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या इन्स्टा रील्स सध्या विशेष चर्चेत आहेत. पारंपरिक सूचना आणि दंडाऐवजी ‌‘ट्रेंडग ऑडिओ‌’ आणि लोकप्रिय संवादशैली व हलक्याफुलक्या एआय निर्मित व्हिडीओंतून रस्ता सुरक्षेचे धडे ‌‘जेन झी‌’ ला दिले जात आहेत.
 


NGP
 
 
सौजन्य: AI फोटो 
 
हेल्मेटचा आणि सीटबेल्टचा वापर, सिग्नलचे पालन, वाहन चालवताना मोबाईल न वापरणे, वेगमर्यादा पाळणे अशा महत्त्वाच्या वाहतूक नियमांचे पालन युवांनी करावे यासाठी त्यांना थेट उपदेश न करता, एआय निर्मित या रील्समध्ये पोलिस कर्मचारीच कलाकार बनून त्यांना नियम समजावून सांगत आहेत. त्यामुळे जेन झी ला या प्रकारचे संदेश अधिक प्रभावीपणे समजत आहेत.
 
 
कमेंट्समधून सकारात्मक दाद
 
 
या रील्सना मोठ्या प्रमाणात लाइक्स, शेअर्स आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून, तरुणांनीही कमेंट्समधून ‌‘रिलेटेबल‌’ आणि ‌‘कूल‌’ असल्याची दाद दिली आहे. सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याच भाषेत संवाद साधणे किती प्रभावी ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. वाहतूक पोलिसांचा हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न राहता, अपघात कमी करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे.
 
 
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिस विविध माध्यमातून जनजागृती करीत आहेत. युवा पीढीला पटकन आकर्षित करण्यासाठी एआय निर्मित व्हिडिओंद्वारे पोलिस जनजागृती करीत आहेत.
- लोहित मतानी (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)
Powered By Sangraha 9.0