आर्वी,
sumit-wankhede : आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत आर्वी तालुयातील सावद-हेटी आणि वाई (रोहणा) येथील दोन महत्त्वाच्या पुलांच्या कामांसाठी ६ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
सावद-हेटी आणि वाई परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात किंवा दैनंदिन प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पुलांची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली होती. आमदार सुमित वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मतदारसंघातील अशा मूलभूत सोयींकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच राज्य शासनाने या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार सुमित वानखेडे यांनी भाजप-महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी-वस्ती मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.