मतदानाआधी पिंपरी-चिंचवडमध्ये वॉशिंग मशीनने भरलेला ट्रक जप्त

13 Jan 2026 15:50:11
पिंपरी-चिंचवड,
seized in Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असताना निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने वॉशिंग मशीनने भरलेला एक ट्रक पकडत मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
 
 
 
seized in Pimpri-Chinchwad
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती आचारसंहिता कक्षाला मिळाली होती. मतदारांना वॉशिंग मशीनचे वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त होताच, राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफएसटी भरारी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
 
 
तपासणीदरम्यान एका वाहनामध्ये तब्बल १९ वॉशिंग मशीन आढळून आल्या. संबंधित वाहनाचा क्रमांक एमएच १४ केए ६३३० असा असून, या संपूर्ण प्रकरणाबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, या साहित्याचा वापर नेमका कोणासाठी आणि कोणाच्या माध्यमातून होणार होता, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाअंतर्गत एसएसटी, एफएसटी आणि व्हीएसटी अशी विविध पथके शहराच्या विविध भागांत सतर्कपणे कार्यरत आहेत.
 
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जात असल्याचेही चित्र समोर येत आहे. काही धनाढ्य उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महागड्या वस्तू, परदेश दौऱ्यांची आमिषे तसेच जमिनीचे प्लॉट देण्याच्या घोषणा केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये स्पर्धा इतकी तीव्र झाली आहे की, महिलांसाठी स्पर्धांमधून बक्षिसे देताना थेट हेलिकॉप्टर राईड देण्यात आल्याच्या घटनाही चर्चेत आल्या आहेत. तर काही ठिकाणी लकी ड्रॉद्वारे मोठ्या भूखंडांचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0