सेलू,
contaminated-water-supply : गत काही दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नळांद्वारे येणारे पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त व अशुद्ध असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित स्वच्छता, पाणी टायांची देखभाल, तसेच शुद्धीकरण प्रक्रिया वेळेवर न झाल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दूषित पाणी पिण्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून, आरोग्य व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे.
कर भरतो, पण स्वच्छ पाणी मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. प्रशासनाने तातडीने पाणी नमुने तपासावेत, दोषी ठिकाणी दुरुस्ती करावी व सुरक्षित पाणीपुरवठ्याची हमी द्यावी, अशी मागणी होत आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास नगरपंचायत समोर उपोषण केले जाईल, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला दिला आहे.