वर्धा,
theft-case : सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेला चोरट्यांनी रात्रीच्या काळोखात टार्गेट केले. या बँकेतून चोरट्यांनी तब्बल २३ लाख ११ हजारांची रोख चोरून नेली. ही घटना मंगळवार १३ रोजी सकाळी उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे जिल्ह्यात चोरट्यांबाबत कमालीची दहशत पसरली आहे.
सुकळी (बाई) येथे बँक ऑफ इंडियाची शाखा तेथील लोकवस्ती पासून हाकेच्या अंतरावर आहे. याच बँकेला रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तेथील तिजोरीतून २३ लाख ११ हजारांची रोख लंपास केली. बुधवारी सकाळी कर्मचारी बँकेत आल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चमूही घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी ठसे तज्ज्ञाची चमू तसेच श्वान पथकाला पाचारण केले होते. माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेमुळे जिल्ह्यातील बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुकळी (बाई) येथील संबंधित बँकेच्या मागील बाजूस शेती आहे. त्याच दिशेला असलेल्या बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील तिजोरी कापून त्यातील रक्कम चोरून यशस्वी पळ काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
बँकेत असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहे. बँकेतील रोख पळविणार्या तिन्ही चोरट्यांनी आपले चेहरे झाकले होते. त्यांनी हायड्रॉलिक कटरने खिडकीचे गज कापले आणि आत प्रवेश करून तीन स्तरांची तिजोरी गॅस कटरने कापून बँकेतील २३ लाख १३ हजार रुपयांपैकी २३ लाख ११ हजार रुपयांची रोख चोरून पोबारा केला.
एक वर्षापूर्वीही चोरीचा प्रयत्न
सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक वर्षापूर्वीही चोरीचा प्रयत्न झाला होता. तेव्हा चोरट्यांनी भिंतीला छिद्र पाडून आत प्रवेश केला होता. मात्र, अलार्म वाजल्याने ते पळून गेले होते. त्यानंतर बँक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था भकम केल्याचे बोलले जात होते, पण चोरट्यांनी बँकेत प्रवेश करीत तिजोरीतील २३.११ लाखांची रोख चोरून नेल्याने बँकेच्या सुरक्षेविषयी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.