विद्या आत्राम नप अध्यक्षपदी आरूढ

13 Jan 2026 11:42:00
तभा वृत्तसेवा
वणी, 
vidya atram वणी नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या विद्या खेमराज आत्राम प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यासोबत वणीच्या मतदारांनी भाजपाच्या झोळीत 18 नगरसेवक टाकले आहे. त्यामुळे वणी नगर परिषदेवर भाजपाची निर्विवाद बहुमताने सत्ता स्थापन झाली आहे. त्याचा पदग्रहण सोहळा सोमवार, 12 जानेवारी रोजी नगर परिषदेच्या प्रांगणात दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.
 
 

विद्या आत्राम  
 
 
नवनिर्वाचित अध्यक्ष विद्या आत्राम यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान, शहर अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश चौधरी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. माजी नप अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विद्या आत्राम यांचे स्वागत करून अध्यक्षपदाचे हस्तांतरण केले.
या पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगर परिषदमध्ये कार्यरत सर्व आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व महिला शिक्षकांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी तारेंद्र बोर्डे यांनी त्यांच्या कार्यकाळात बगीच्यांचा विकास, रस्ते नाल्या, आरोग्य या विविध विषयात केलेल्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला.vidya atram त्यानंतर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल चौहान यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पक्षभेद विसरून काम करण्याचे आवाहन केले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक बाबतीत प्रचंड निधी दिल्यामुळे वणी शहराचा चेहरा मोहरा बदलवू शकलो. यानंतरही वणीकरांच्या अपेक्षा पूर्ण करू, असे आश्वस्त केले.
डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांच्या विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेवा व समर्पण भाव घेऊन प्रत्येक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे सुचविले. त्यासोबत भयमुक्त शहर असल्याची जाणीव येथील महिलांमध्ये निर्माण करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी गव्हाणे यांनी केले. या प्रसंगी दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, प्रदीप जेऊरकर, जयमाला दर्वे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0