‘विकसित भारत २०४७’साठी नव्या अभियंत्यांचे योगदान आवश्यक

13 Jan 2026 18:14:42
– पद्मश्री प्रा. गणपती यादव यांचे प्रतिपादन
- एलआयटी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
नागपूर, 
'viksit bharat 2047' विकसित भारत २०४७ साकारण्यासाठी नव्या पिढीतील अभियंत्यांनी तंत्रज्ञान, संशोधन व नवोपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन पद्मश्री प्रा. गणपती यादव यांनी केले. नागपूर येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (एलआयटी) च्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा सोहळा संस्थेचे संस्थापक राव बहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता.
 
desh
 
 
मुख्य अतिथी म्हणून मॉईल लिमिटेडचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना, तर सन्माननीय अतिथी म्हणून इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द प्रमोशन ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्चचे संचालक प्रा. नितीन सेठ, कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, राज्यपाल नामनिर्देशित सदस्य उत्कर्ष खोपकर व प्रमुख सल्लागार मोहन पांडे उपस्थित होते.
'viksit bharat 2047' प्रा. यादव यांनी रिसायकल इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, मॉलिक्युलर सिम्युलेशन व डिजिटल ट्विन्स हे भविष्यातील संशोधनाचे केंद्र असल्याचे नमूद केले. एलआयटीला मध्य भारतातील नवोपक्रम व उद्योजकतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करण्याची मागणी त्यांनी मांडली. अजित कुमार सक्सेना यांनी विदर्भातील मँगनीज बेल्टचे औद्योगिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना सातत्याने कौशल्यवृद्धी, शिस्त व आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.
कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा, सौरऊर्जेवर आधारित कार्बन-न्यूट्रल परिसर व आगामी अभ्यासक्रमांची माहिती दिली. प्रा. नितीन सेठ यांनी “तुमचे कामच तुमची ओळख ठरू द्या,” असा संदेश दिला. या दीक्षांत समारंभात ८२ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना ५ सुवर्ण व ५ रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. पसायदान व राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0