रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी सुरक्षित प्रवासातूनच सुरक्षित भविष्य: जिल्हाधिकारी

13 Jan 2026 18:59:26
वाशीम, 
yogesh-kumbhejkar : ‘रस्ता सुरक्षा - जीवन रक्षा’ हा संदेश केवळ घोषवाय न राहता तो आपल्या दैनंदिन सवयींमध्ये उतरला पाहिजे. सुरक्षित प्रवास ही आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आहे. त्यामुळे वाहन चालविताना संयम, शिस्त आणि जबाबदारी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अपघातमुक्त व सुरक्षित वाशिम घडविण्यास हातभार लावावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
LK;
 
जिल्ह्यात ३७ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत रस्ता सुरक्षा जीवन रक्षा या संदेशासह भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते.
 
 
या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अजीम शेख, शहर पोलिस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब नाईक, मोटार वाहन निरीक्षक दिनेश सुरडकर, विनोद घनवट व रोहीदास विनकरे, दादासाहेब बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
उपस्थितांनी आपल्या मनोगतातून वाहन चालविताना नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे व मोबाईलचा वापर टाळणे याचे महत्त्व अधोरेखित केले. रस्ता अपघातांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
 
 
या वेळी वाहतूक नियमांवरील पत्रक व माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या साहित्याद्वारे वाहनचालक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालना व अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून सुरक्षित प्रवासाची संस्कृती रुजविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असून, रस्ता सुरक्षा — जीवन रक्षा हा संदेश प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजविण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.
 
 
रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथून या सुरुवात झाली. मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालय, विश्राम भवन, सिव्हिल लाईन बस स्थानक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, नगर परिषद मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे समारोप झाला. रॅलीच्या यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला.
Powered By Sangraha 9.0